Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
कर्नाटकातील अनेक महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केलेला धर्मनिरपेक्ष जनता दलाचा (जेडीएस) खासदार प्रज्ज्वल रेवण्णा याच्याबाबत पंतप्रधानांना उत्तर द्यावेच लागेल, असे राहुल गांधी म्हणाले. प्रज्वलचे सर्व धंदे माहीत असूनही केवळ मतांसाठी शेकडो मुलींचे शोषण करणाऱ्या या राक्षसाला पंतप्रधान मोदींनी प्रोत्साहन का दिले, एवढा मोठा गुन्हेगार देशातून इतक्या सहजतेने कसा पळून गेला, असे प्रश्न राहुल यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमाद्वारे विचारले आहेत.
‘मोदी यांच्या शासनकाळात देशभरातील गुन्हेगारांचे मनोबल उंचावले आहे. कैसरगंजपासून कर्नाटकपर्यंत आणि उन्नावपासून उत्तराखंडपर्यंत, पंतप्रधानांनी महिला अत्याचार करणाऱ्या कित्येक गुन्हेगारांना दिलेले छुपे समर्थन देशभरातील अशा गुन्हेगारांना प्रोत्साहन देत आहे. मोदींच्या ‘राजकीय कुटुंबाचा’ भाग असणे ही गुन्हेगारांसाठी ‘सुरक्षेची गॅरंटी’ आहे का, असा प्रश्नही राहुल यांनी केला.
भाजपचा मित्रपक्ष जेडीएसचा खासदार म्हणून प्रज्ज्वल रेवण्णा २०१९ पासून कर्नाटकातील हसन येथून निवडून येत आहे. त्यांचे आजोबा व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी प्रज्वल याच्यासाठी सलग पाच वेळा विजय मिळवलेली ही जागा सोडली होती. २६ एप्रिल रोजी हसनमध्ये झालेल्या निवडणुकीच्या काही दिवस आधी त्याच्याशी संबंधित अश्लील व्हिडीओ समोर आले होते.
‘पलायन करण्यास देवगौडांचीच मदत’
वृत्तसंस्था, यादगीर (कर्नाटक)
महिलांच्या लैंगिक छळाच्या व्हिडीओप्रकरणातील आरोपी प्रज्वल रेवण्णा याला जनता दल सेक्युलरचे प्रमुख व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनीच देशाबाहेर जाण्यास मदत केली, असा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी केला.
कर्नाटकातील सेक्स स्कॅण्डलप्रकरणी राज्य सरकारने विशेष तपास पथक स्थापन केले आहे. या प्रकरणातील आरोपी प्रज्वल हा भाजप-जेडीएसचा हसन मतदारसंघातील उमेदवार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर म्हणजे २६ एप्रिलनंतर प्रज्वलने जर्मनीला पलायन केल्याचे मानले जाते. त्यावरून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजप आणि जेडीएस या पक्षांना लक्ष्य केले.
‘परदेशात प्रवासासाठी व्हिसा आणि पारपत्र केंद्र सरकार देते. त्यामुळे केंद्र सरकारच्या माहितीशिवाय प्रज्वल परदेशात जाऊ शकेल का, असा प्रश्न उपस्थित करीत सिद्धरामय्या यांनी देवेगौडा यांनीच त्याला परदेशात पाठविण्याचे नियोजन केले, असा आरोप केला. राज्यातील काँग्रेस सरकारने प्रज्वलला परदेशात पाठवल्याचा भाजपचा आरोप सिद्धरामय्या यांनी फेटाळला.