Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बेहरामपूरमध्ये यंदा ‘खेला होबे’? अधीर रंजन चौधरी अन् युसूफ पठाण यांच्यात चुरशीची लढत

10

बेहरामपूर: पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेहरामपूर हा एक प्रतिष्ठित मतदारसंघ. डाव्यांची सद्दी संपवून, मागील पाच निवडणुका जिंकणारे काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांच्यासमोर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने निवृत्त क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना उतरवून यंदा चांगलीच चुरस निर्माण केली आहे. चौधरी यांना यंदाची दुरंगी निवडणूक कधी नव्हे इतकी जड जाईल, याची शंका स्थानिक काँग्रेसजनांना आहे, तर तृणमूल नेत्यांना येथे ‘खेला होबे’ असे ठामपणे वाटत आहे.

मुर्शिदाबाद जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बेहरामपूरचे बंगाली भाषेतील प्रचलित नाव ब्रह्मपूर. विडी उद्योग, रेशीम, थर्माकोल, ज्यूट उद्योगासाठी प्रसिद्ध बेहरामपूरमध्ये अपवाद वगळता एक-दोन टर्ममध्ये खासदार बदलण्याची परंपराच नाही. क्रांतिकारी समाजवादी पक्षाचे (आरएसपी) त्रिदिब चौधरी (१९५२ ते १९८४), नानी भट्टाचार्य आणि प्रमथेश मुखर्जी तसेच काँग्रेसचे आतिशचंद्र सिन्हा (१९८४) आणि आता अधीर रंजन चौधरी हे फक्त पाच खासदार आतापर्यंत झाले आहेत. स्वातंत्र्योत्तर काळातील डाव्यांचा हा बालेकिल्ला अधीर रंजन चौधरी यांनी १९९९मध्ये हिसकावून घेतला. त्रिदिब चौधरी यांचा सर्वाधिक सात वेळा निवडून येण्याचा विक्रम मोडण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या अधीर रंजन यांच्यासमोर युसूफ पठाण यांच्या रूपाने प्रथमच आव्हान निर्माण झाले आहे.

भाजपने येथे निर्मलकुमार साहा यांना उमेदवारी दिली असली, तरी खरी लढत दुरंगीच. ममता बॅनर्जी यांच्या कट्टर टीकाकारांत चौधरी अग्रस्थानी आहेत. ‘इंडिया’ आघाडीत राहण्याबाबत ममता यांचे आत-बाहेर सुरू झाले, तेव्हापासून चौधरी यांनी त्यांच्यावर घणाघाती आरोप सुरू केले. मग बॅनर्जी यांनी त्यांच्याविरोधात भक्कम उमेदवाराचा शोध सुरू केला. तो युसूफ पठाण यांच्यापाशी थांबला.

२०२१मध्ये प्रथमश्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेणारे युसूफ पठाण आयपीएलमध्ये कोलकता नाइट रायडर्स संघाकडून खेळत असताना, त्यांची व ममता यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांची मैत्री झाली व ती कायम राहिली. सुरुवातीला राजकारणाच्या मैदानात उतरण्यासाठी तयार नसलेले युसूफ यांच्यासह त्यांच्या पत्नी आफरीन, क्रिकेटपटू भाऊ इरफान यांचे मन वळवण्यात अभिषेक यांचा मोठा वाटा राहिला. दुसरीकडे, २०११च्या जनगणनेनुसार मुर्शिदाबाद जिल्ह्यात तब्बल ६६.२ टक्के लोकसंख्या मुस्लिम, तर ३३.२ टक्के हिंदू आहेत. तृणमूल व भाजपला या जागेवर पाणी सोडावे लागले आहे . यंदा तो रिवाज बदलायचाच, या हट्टाला बॅनर्जी आत्या-भाचे पेटले आहेत.

बेहरामपूरमधील सातपैकी सहा विधानसभा मतदारसंघ तृणमूलच्या, तर भरमपूर मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. काँग्रेसकडे येथे एकही आमदार नाही. खुद्द अधीर रंजन चौधरी हे कोविडकाळात बेहरामपूरमधून अदृश्य होते, अशी स्थानिकांची तक्रार आहे. पायाभूत सुविधा, रोजगारसंधींसाठी आवश्यक केंद्रीय गंगाजळी आणण्यात अपयश का आले, या प्रश्नांची उत्तरे २५ वर्षे खासदार असलेल्या चौधरी यांनी द्यावीत, हे तृणमूलचे म्हणणे आहे. त्यांच्या काळात या भागात गुंडगिरी वाढवल्याचाही प्रचार केला जातो. आपल्याला स्थानिकांचा जबरदस्त पाठिंबा असून आता आम्ही तुम्हाला येथून जाऊ देणार नाही, असे लोक सांगत असल्याचे पठाण यांचे म्हणणे आहे. बेहरामपूरच्या स्थलांतरित कामगारांसाठी रोजगारसंधी, जागतिक दर्जाचे क्रीडासंकुल, स्थानिक रेशीम, थर्माकोल आणि ज्यूट उद्योगातील कामगारांसाठी पायाभूत सुविधा यांसारखी आश्वासने ममता बॅनर्जी देत आहेत.

नगरमध्ये सुजय विखे यांना निलेश लंके यांचे आव्हान, पतीच्या प्रचारासाठी मिसेस लंकेंकडून प्रचार

यंदा भूमिपुत्र हा मुद्दाही बंगालमध्ये विशेष चर्चेत आहे. आपण ‘बाहेरील’ आहोत, हा भाजपचा प्रचार धुडकावताना पठाण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघाचे उदाहरण देतात.

अधीर रंजन चौधरी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले अधीरबाबू १९९९पासून पाच वेळा येथून निवडून आले आहेत. काँग्रेसने २०१९मध्ये त्यांना लोकसभेचे गटनेतेपद दिले. लोकसभेत ते मोदी सरकारवर तुटून पडतात. मात्र राष्ट्रीय राजकारण करताना, आपल्याच मतदारसंघाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप व केंद्राकडून पुरेसा विकास निधी आणण्यात अपयश याचा फटका चौधरी यांना बसू शकतो.

युसूफ पठाण : क्रिकेटस्टारचे वलय असलेल्या पठाण यांना ममता बॅनर्जी यांनी येथील जातीय समीकरणे पाहून रिंगणात उतरविले आहे. चौधरी यांच्याविरुद्ध राजकीय नेत्याची डाळ शिजत नाही हे सातत्याने दिसल्यावर बॅनर्जी यांनी वलयांकित पठाण यांना उमेदवारी देण्याचा डाव खेळला. पठाण याच्या रूपाने ममता यांनी बेहरामपूरवर बाहेरचा उमेदवार लादल्याचा विरोधकांचा आरोप आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.