Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
‘नाच गं घुमा’ पडला ‘बाई पण…’वर भारी? मुक्ता बर्वेच्या सिनेमाची पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई,आकडा एकदा वाचाच
मुंबई : ‘नाच गं घुमा’ या बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाने प्रदर्शनाआधी काही विक्रम प्रस्थापित केलेच, पण प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी १ मे रोजी चित्रपटाने तब्बल २.१३ कोटींचा व्यवसाय करत विक्रम प्रस्थापित केला असून त्याद्वारे चित्रपट २०२४ मधील हिट चित्रपट तर ठरलाच आहे पण मराठी चित्रपसृष्टीच्या इतिहासातील पहिल्या दिवसाच्या व्यवसायाच्या बाबतीत चित्रपटाचा तिसरा क्रमांक लागला आहे. ही माहिती या चित्रपटाच्या देशभरातील वितरणाची जबाबदारी ज्यांनी घेतली आहे त्या पॅनोरमा स्टुडीओजचे व्यवस्थापकीय भागीदार मुरलीधर चटवानी यांनी दिली आहे.
चित्रपटाने प्रदर्शानाधीच २० हजार तिकिटांच्या बुकींगचा विक्रम नोंदविला होता. या चित्रपटाच्या तिकिटांचे आणि शोंचे हे आरक्षण ‘बुक माय शो’वर आरक्षण सुरु होण्याआधीच नोंदविले गेले आहे, हे विशेष. मुंबई, पुणे, ठाणे, नवीन मुंबईसह नाशिक, नागपूर, पिंपरी चिंचवड या केंद्रांवरही चित्रपटाच्या बुकिंगला तुफान प्रतिसाद मिळाला होता. महिला प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ असून त्यांच्या अनेक ग्रुपनी चित्रपटाचे संपूर्ण शो आरक्षित केले आहेत. अनेक महिलांनी तो आपल्या मोलकरणीं बरोबर पाहण्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर जेव्हा हा चित्रपट बुधवारी १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला तेव्हा नवीन विक्रम चित्रपटाने प्रस्थापित केले.
” महाराष्ट्र दिनी महाराष्ट्रीयन रसिकांचा ‘नाच गं घुमा’ला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. ‘नाच गं घुमा’ चालू वर्षीचा हिट सिनेमा ठरला आहेच पण मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत हे कलेक्शन तिसऱ्या क्रमांकावर आहे. प्रेक्षक चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देत असून बुधवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला पाच दिवसांच्या विकेंडचा फायदा मिळणार आहे,” असे उद्गार चटवानी यांनी काढले आहेत.
काही रिपोट्सनुसार बाई पण भारी देवा सिनेमानं पहिल्या दिवशी १.१५ कोटींची कमाई केली होती. पण नाच गं घुमा सिनेमानं पहिल्या दिवशी तब्बल २.५ कोटींचा गल्ला जमवला आहे.
परेश मोकाशी दिग्दर्शित ‘ नाच गं घुमा ‘ मध्ये मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव यांच्या मध्यवर्ती भूमिका असून त्यांच्या जोडीला सुकन्या कुलकर्णी,सुप्रिया पाठारे, सारंग साठे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत आणि बालकलाकार मायरा वायकुळ या आघाडीच्या आणि नावाजलेल्या कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी यांनी चित्रपटाचे लेखन केले असून त्यांच्यासह शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील आणि स्वप्नील जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.