Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सन १९९६पासून हा मतदारसंघ भाजपकडे आहे. १९९६ ते २००४मध्ये झालेल्या चार निवडणुकांत अशोक अर्गल निवडून आले. २००९ साली नरेंद्रसिंह तोमर, २०१४ साली अनूप मिश्रा, तर २०१९ साली पुन्हा तोमर निवडून आले. यंदा पक्षादेशावरून केंद्राच्या राजकारणाला रामराम करून नरेंद्रसिंह तोमर राज्याच्या राजकारणात आले. मागील ‘टर्म’मध्ये ते याच लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते. या वेळी पक्षाने त्यांचा शब्द राखत शिवमंगलसिंह तोमर यांना उमेदवारी दिली. विधानसभा निवडणुकीत दोनदा पराभव आणि एकदा अतिशय कमी मतफरकाने विजय असा शिवमंगलसिंह यांचा राजकीय अनुभव आहे. त्यांची उमेदवारी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना आवडलेली नाही. तरीही ‘अब की बार’साठी जोर लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. नरेंद्रसिंह तोमर यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची जागा आहे.
काँग्रेसने येथून सत्यपालसिंह सिकरवार ‘नीटू’ यांना उमेदवारी दिली आहे. ते भाजपमधून काँग्रेसमध्ये आले आहेत. ‘कांटे से कांटा’ काढण्याची ही रणनीती यशस्वी होईल, असा पक्षाला विश्वास आहे. ते सुमावलीचे आमदार होते. त्यांचे लहान भाऊ नरेंद्रसिंह सिकरवार हेही राजकारणात सक्रिय आहेत. भावासाठी दिवस-रात्र एक करीत आहेत. प्रचारादरम्यान दहाक दिवसांपूर्वी त्यांच्यावर गोळीबार झाला. प्रचार असा ‘धाय धाय’ सुरू आहे. शहरात भाजपच्या समर्थकाच्या घरावर कमळ, तर काँग्रेस समर्थकाच्या घरावर पंजा फडकत असताना दिसते. नागरिकांमध्ये मतदानाविषयी उत्सुकता आहे. निकाल काय लागणार, याकडे लक्ष लागून आहे.
उद्योगपतीला ‘हत्ती’चे बळ
भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांच्या घमासानमध्ये बसपकडून रमेशचंद गर्ग यांनी आपला प्रचार सुरू ठेवला आहे. ते मुरैनातील उद्योगपती आहेत. गर्ग हे मुरैनाचे प्रतिष्ठत घराणे आहे. रमेशचंद गर्ग हे के. एस. ऑइल्सचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आहेत. ग्वाल्हेरमध्ये बसपचा उमेदवार काँग्रेसचे मतविभाजनासाठी उभा केला गेला, असे सांगितले जाते. काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये राजपुतांची मते विभाजित होतील. अशास्थितीत ओबीसी, मुस्लिम यांची मते निर्णायक ठरणार आहेत.
‘लढाई’साठी ग्वाल्हेरवरून रसद
कधीकाळी ग्वाल्हेरच्या शिंदेंना आणि ब्रिटिशांच्या आक्रमक प्रवृत्तीपुढेही न झुकलेल्या मुरैनातील राजकीय लढाईसाठी ग्वाल्हेरवरून रसद पुरविली जात आहे. ग्वाल्हेर आणि मुरैना यात उणेपुरे चाळीस किलोमीटरचे अंतर आहे. नोकरीसाठी वा अन्य कामांसाठी मुरैनावासीयांना ग्वाल्हेर जवळ पडते. काँग्रेसचे उमेदवार सिकरवार यांच्या वहिनी शोभा सिकरवार या ग्वाल्हेरच्या विद्यमान महापौर आहेत.