Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
दिग्विजय सिंह हे राघोगडचे राजा. त्यांची ही ‘गादी’ गुना जिल्ह्यात; पण राजगड लोकसभा मतदारसंघात येते. दिग्विजय सिंह यांचे पुत्र जयवर्धन सिंह हे राघोगडचे आमदार आहेत. कनिष्ठ बंधू लक्ष्मण सिंह यांनी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून या मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे. २०१४पासून ही जागा भाजपकडे आहे. रोडमल नागर यंदा हॅटट्रिकसाठी उत्सुक आहेत. त्यांच्यापेक्षा ‘मोदीं’ना मत देण्यासाठी इथले मतदार उत्सुक दिसतात. पीलूखेडी, नरसिंगगड, ब्यावरा आणि राजगड या चार गावांचा असाच मूड जाणवला.
राजगडला जायचे असेल तर मुख्य महामार्गावरील ब्यावरा या अतिशय वर्दळीच्या गावातील बायपासवरून वळावे लागते. हे गाव राजगडपासून कमी उंचीवर. जणू पायथ्याशी. येथून महामार्ग जातो. रेल्वेने हे जोडलेले आहे. नवे मोठे रेल्वे स्थानक होत आहे. हे मोठे व्यापारी केंद्र आहे. अशारीतीने हे महत्त्वाचे ठिकाण. पीपल चौक हा महत्त्वाचा चौक. ‘बावरा मन देखने चला, एक सपना…’ या ब्यावरा येथील मतदारांच्या मनात काय आहे? एका रहिवाशाला विचारले. ‘विकास’ हे उत्तर मिळाले. ‘तुम्ही राजगडला जाताना आजूबाजूला बघा. शेतात हिरवी झाडे दिसतील. हे केंद्रामुळे झालेल्या मोहनापूर धरणामुळे शक्य झाले. अशी अनेक उदाहरणे आहेत. विकास कसा डोळ्यांनी दिसतो.’ त्यांची माहिती. राजगडच्या रस्त्यात धरणाचे बॅक वॉटर दिसते. संत्र्याच्या काही बागा दिसतात. तसा हा सारा माळवा पठाराचा भाग. दरम्यान, ‘धर्माच्या नावाखाली दोन समुदायांमध्ये भांडणे लावली जात आहेत. बेरोजगारीकडे कुणाचे लक्ष नाही. निवडणुकीच्या काळात महिनाभर नमस्कार करणार, पाया पडणार नंतर इकडे कुणी फिरकणारही नाही’, अशी व्यथा राजगडचे एक काका सांगतात. मित्र दुजोरा देतात.
विणता व्होटबँकांचे जाळे
या मतदारसंघात विविध जाती आहेत. या जातींची व्होटबँक आहे. धाकड समाजाची सुमारे अडीच लाखांवर मते आहेत. रोडमल नागर हे धाकड आहेत. दांगी समाज दोन लाखावर, सोंधिया १ लाख ८० हजाराच्या घरात आहे. कंवर १ लाख ४० ते १ लाख ५० हजार आहेत. या मतांवर बरेच काही ठरते. राजगड जिल्ह्यातील पाच विधानसभा क्षेत्रांतील चौदापैकी तेरा नगरपालिका/नगर पंचायती भाजपकडे, तर नरसिंगगडची काँग्रेसकडे आहे. तेही भाजपमध्ये दोन गटांच्या भांडणात काँग्रेसचे फावले, अशी माहिती नरसिंगगडच्या धर्मेंद्र जयस्वाल यांच्याकडून मिळते.
बाळासाहेबांचा ‘माजी’ शिवसैनिक
मोहन शर्मा या नावाचा नरसिंगगडमध्ये दबदबा आहे. भाजपचे याच नावाने असलेल्या विधानसभा क्षेत्राचे ते प्रतिनिधित्व करतात. ते बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात. शिवसेनेचे येथे त्यांनी अस्तित्व निर्माण केले. शिवसेनेला जिवंत ठेवले. अगदी २००२-२००३पर्यंत ते शिवसेनेत होते. नंतर भाजपमध्ये गेले आणि २००४मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. कट्टर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून ते परिचित आहेत. ‘नरसिंगगड हे जरा संवेदनशील गाव आहे’, असे एक स्थानिक सांगतो.