Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आंध्रात सत्तासंघर्ष नव्हे, तर अस्तित्वाची लढाई; जगनमोहन रेड्डी यंदाही गड राखतील?

10

अब्दुल वाजेद, विजयवाडा : आंध्र प्रदेशात लोकसभेबरोबरच विधानसभेसाठीही मतदान होत असून, राज्यातील सत्ता टिकवण्यासाठी वायएसआर काँग्रेसने कंबर कसली आहे. तर, तेलगू देसमने भाजप आणि जनसेना या पक्षांबरोबर हातमिळवणी करून सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. या लढाईबरोबरच काँग्रेससाठीही ही अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे उन्हाबरोबरच प्रचाराचाही पारा चढला असून, परस्परांवर होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण चांगलेच तापले आहे.

आंध्र प्रदेशात १३ मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. काही महिन्यांपूर्वीपर्यंत वायएसआर काँग्रेसची बाजू वरचढ वाटत होती. मात्र, तेलगू देसम, भाजप यांच्याबरोबरच अभिनेता पवनकल्याण यांचा जनसेना हे पक्ष एकत्र आल्यामुळे रंगत आली आहे. तसेच, जगनमोहन रेड्डी यांची बहीण वाय. एस. शर्मिला यांनीही आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला आणि आंध्र प्रदेशचे नेतृत्व त्यांच्याकडे आले. काँग्रेसने डाव्या पक्षांबरोबर आघाडी केली आहे. त्यातून एकतर्फी वाटणारी निवडणूक तिरंगी झाली आहे. गेल्या निवडणुकीत वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांना आंध्र प्रदेशातील लोकांनी मतदानातून भरभरून आशीर्वाद दिला होता. यंदा आंध्र प्रदेशातील निवडणूका अटीतटीची ठरत आहे. कल्याणकारी योजनांमुळे जनता साथ देईल, असा जगनमोहन रेड्डी यांना विश्वास वाटत आहे. तर, त्यांच्याविरोधात वातावरण निर्माण करण्यात तेलगू देसम-भाजपला यश आले आहे. गेल्या निवडणुकीत वायएसआर काँग्रेसने लोकसभेच्या २५पैकी २३ मतदारसंघांमध्ये विजय मिळवला होता; तर विधानसभेत १७५पैकी १५१ जागा त्यांना मिळाल्या होत्या.

सर्वच पक्षांनी तगडे उमेदवार उभे करून, सत्तेचा आकडा गाठण्यासाठी चंग बांधला आहे. जगनमोहन रेड्डी यांची लोकप्रियता कायम असल्याचे दिसून येत आहे. मात्र, विजयासाठी त्यांना सरकारच्या योजनांवर भिस्त ठेवावी लागत आहे. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह सर्व विरोधी नेत्यांसाठी ‘करो या मरो’ अशी स्थिती आहे.
मातोश्रींच्या बालेकिल्ल्यातून राहुल गांधी रिंगणात, अमेठी-रायबरेलीचा सस्पेन्स संपला, दोन उमेदवार जाहीर
पदयात्रेतून सिंहासनापर्यंत

आंध्र प्रदेशात २०१७मध्ये वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी ‘प्रजा संकल्प यात्रा’ सुरू केली होती. त्यांनी या यात्रेमध्ये तीन हजार ६४८ किलोमीटरचा प्रवास केला होता. राज्यातील १७५पैकी १३० विधानसभा मतदारसंघांमधून त्यांची ही यात्रा गेली होती. यामध्ये त्यांनी १२४ सभा घेतल्या. या संकल्प यात्रेतून तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याविरोधात वातावरण तयार करण्यात त्यांना यश आले होते. जगनमोहन यांचा हा प्रवास पदयात्रेतून सिंहासनापर्यंत पोहोचल्याचे त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी सांगतात.

अशी आहेत सध्याची परिस्थीती

आंध्र प्रदेशात २५ लोकसभा मतदारसंघांमध्ये ५०३ जणांनी अर्ज भरला. तर नामानिर्देशन पत्र परत घेण्याची आणि इतर कार्यवाहीनंतर सध्या राज्यात २५ जागांवर ४५४ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. राज्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये चुरस दिसून येत असून, सर्व उमेदवारांनी प्रचारामध्ये कोणतीही कसर बाकी न ठेवण्याचे धोरण ठेवले आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.