Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मटा ग्राउंड रिपोर्ट: कॉंग्रेसच्या सहा हमींभोवतीच प्रचाराचे केंद्र; जनतेच्या फसवणुकीचा विरोधकांचा आरोप

12

हैदराबाद : विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर तेलंगणमधील सत्ताधारी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीतील सहा हमींच्या मुद्द्यावरच काँग्रेसकडून प्रचार करण्यात येत आहे, तर विरोधकांनी काँग्रेसने खोटी आश्वासने देऊन फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे, राष्ट्रीय मुद्द्यांपेक्षा तेलंगणमधील प्रचार काँग्रेसच्या सहा हमींभोवतीच फिरताना दिसत आहे.

तेलंगणमध्ये डिसेंबर २०२३मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत, नऊ वर्षांची भारत राष्ट्र समितीची (बीआरएस) सत्ता उलथवून काँग्रेसचे रेवंत रेड्डी मुख्यमंत्री झाले. निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी सहा हमींच्या माध्यमातून दिलेली १३ आश्वासने चर्चेत होती. यामध्ये महिला, शेतकरी, मजूर आणि युवक यांच्यावर लक्ष केंद्रित केले होते. विधानसभेपाठोपाठ आलेली लोकसभा निवडणूक म्हणजे सरकारच्या १२० दिवसांच्या कारभारावरील कौल आहे, असे रेवंत रेड्डी यांनी म्हटले आहे. आताही हैदराबादमध्ये मेट्रोच्या पुलाखालील जागांवर या सहा हमींच्या माध्यमातून काँग्रेसने जाहिरात केली आहे. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील योजनांच्या माध्यमातून त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न दिसून येतो.

विधानसभा निवडणुकीतील या आश्वासनांपैकी महिलांना मोफत प्रवास, ५०० रुपयांमध्ये सिलिंडर, आरोग्य विमा या योजनांची अंमलबजावणी झाली असून, स्वत:चे घर नसणाऱ्यांसाठी पाच लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्याची योजना काही घटकांसाठी लागू करण्यात येत आहे. त्यामुळे, विधानसभा निवडणुकीतील केवळ तीन आश्वासनेच पूर्ण होत आहेत, असा आरोप करण्यात येत आहे. ‘रेवंत रेड्डी यांनी एप्रिलपर्यंत सर्व आश्वासने पूर्ण करणार असल्याचे सांगितले होते. आता ते आचारसंहितेचे कारण सांगून ऑगस्टचा वायदा करीत आहेत. मात्र, त्यांच्याविरोधातील ‘कॅश फॉर व्होट’ या प्रकरणाचा निकाल जुलैमध्ये येत आहे. त्यामुळे, जुलैनंतर ते मुख्यमंत्रिपदावर राहतील की नाही, याची शंका आहे,’ याकडे भाजप कार्यकर्ते लक्ष वेधत आहेत. तर, ‘बीआरएस’च्या काळामध्ये शेतकऱ्यांना १० हजार रुपये प्रतिएकर निधी देण्यात येत होता. काँग्रेसने तो निधी रोखला आणि नव्याने जाहीर केलेलाही निधी दिलेला नाही. त्यामुळे, शेतकरी अडचणीत आले आहेत, असा आरोप ‘बीआरएस’ नेत्यांनी केला आहे.

काँग्रेस सरकारकडून आश्वासनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रक्रिया राबवण्यात येत आहेत. या योजना जनतेच्या कल्याणासाठी आहेत, त्यामुळेच काँग्रेसच्या केंद्रीय जाहीरनाम्यामध्येही त्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सुनीता राव यांनी दिली.

काँग्रेसच्या सहा हमी

महालक्ष्मी हमी : महिलांना मोफत बसप्रवास, दर महिना २५०० रुपयांचा भत्ता, ५०० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर
रायतू भरोसा : शेतकऱ्यांसाठी प्रति वर्षी प्रतिएकर १५ हजार रुपयांचे मानधन, शेतमजूरांना १२ हजार रुपये, भाताच्या शेतीला दर वर्षी ५०० रुपयांचा बोनस
गृहज्योती : प्रत्येक घराला २०० युनिटपर्यंत मोफत वीज
इंदिराम्मा इंडलू : वेगळ्या तेलंगण चळवळीतील कार्यकर्त्यांना भूखंड, स्वत:चे घर नसणाऱ्यांसाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे अनुदान
युवा विकासम : विद्या भरोसा कार्डमध्ये पाच लाख रुपये शिक्षणासाठी, प्रत्येक मंडळात तेलंगण इंटरनॅशनल स्कूल सुरू करणार
चेयुता : ज्येष्ठ नागरिकांना चार हजार रुपये निवृत्तीवेतन सुरू करणार; गरिबांना १० लाख रुपयांपर्यंत राजीव आरोग्य विमा
रेड्डींनी अमित शहांचा ‘तो’ व्हिडीओ प्रसारितच केला नाही, दिल्ली पोलिसांसमोर वकिलांचा दावा
राज्यातील काँग्रेस सरकारच्या अपयशावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेसने सहा हमींची घोषणा केली होती, मात्र त्यांना आश्वासने पूर्ण करण्यामध्ये पूर्णत: अपयस आले आहे. त्यांनी दिलेले एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही.-एन. व्ही. सुभाष, प्रवक्ते, भाजप, तेलंगण

बीआरएसच्या कार्यकाळामधील कल्याणकारी योजना काँग्रेसने रोखल्या आणि आता त्यांना दिलेली आश्वासनेही पूर्ण करता आलेली नाहीत. आताही पुन्हा तेलंगणसाठी नवी २३ आश्वासने देण्यात आली आहेत. पूर्वीचीच आश्वासने पूर्ण झाली नाहीत; नव्या आश्वासनांची अंमलबजावणी कशी होणार-पोन्नला लक्ष्मय्या, माजी मंत्री व नेते बीआरएस

समाजातील सर्व घटकांचा विचार करून, काँग्रेसने आश्वासने दिली होती. या आश्वासनांची पूर्तता करण्यात येत आहे. याशिवाय, जनतेच्या कल्याणासाठी आणखीही आश्वासने आम्ही दिली असून, सत्ता आल्यानंतर त्याचीही पूर्तता करण्यात येईल. सुनीता राव, प्रदेशाध्यक्षा, महिला काँग्रेस, तेलंगण

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.