Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Lok Sabha Elections:कन्नौजमध्ये अखिलेशच ‘विकासपुरुष’; ‘सप’कडून विकासकामे अधोरेखित, भाजपसोबत आरपारची लढत
कन्नौज हा समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला. सन १९९८पासून येथे पक्षाचा उमेदवार निवडून येत आहे, मोदी लाटेतही पक्षाची पकड कायम राहिली. २०१९मध्ये मात्र ‘सप’चा विजयरथ रोखला गेला. पाठक यांनी डिंपल यादव यांचा १२,३५३ मतांनी पराभव केला. सन २०१४मध्ये डिंपल १९ हजार मतांनी जिंकल्या होत्या. यामुळे आता ‘ब्रेक’नंतर अखिलेश स्वत: रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर ही निवडणूक कन्नौज क्रांती ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे. तर अखिलेश यांचे नाव जाहीर होताच हा भारत-पाकिस्तानमधील सामना आहे, असे पाठक म्हणाले. माजी मुख्यमंत्री आणि एक खासदार यांच्यामधील ही लढाई प्रदेशात औत्स्युक्याचा विषय ठरली आहे.
भाजप मतदारांकडूनही अखिलेश यांच्याविषयी आदर
राम मंदिर, मोदींची हमी या देशभरात अधोरेखित होणाऱ्या मुद्द्यांपेक्षा कन्नौजमधील विकास हा येथील निवडणुकीचा कळीचा मुद्दा आहे. सपच्या काळात कन्नौजमध्ये झालेल्या विकासाची यादीच प्रचारादरम्यान वाचून दाखवली जाते. याबाबत मतदारांमध्येही दुमत नाही. भाजपच्या बाजूने असलेल्या मतदारांमध्येही अखिलेश यांच्याविषयी आदर दिसतो. केवळ केंद्रात मोदी हवे असल्याने मत भाजपला, अन्यथा अखिलेश यांच्याविरोधात बोलण्यासारखे काही नाही, असे मतदार सांगतात. भाजपकडूनही ‘विरासत भी, विकास भी’ असा प्रचार करण्यात येत आहे.
चार विधानसभा जागांवर भाजप
कन्नौजमध्ये कन्नौज, तिर्वा, छिबरामऊ, बिधुना आणि रसुलाबाद विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये बिधुना वगळता सर्व मतदारसंघ भाजपकडे आहेत. एकमेव बिधुना ‘सप’कडे आहे. ‘सप’समोरही अनेक आव्हाने आहेत. पक्षातील काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काही प्रभावी यादव नेत्यांसोबत पक्षाने अंतर ठेवले आहे. येथील सुमारे २.७५ लाख ब्राह्मण मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी समाजवादी पक्षाकडे कोणताही ब्राह्मण चेहरा नाही. तिर्वामधील लोध आणि पाल मतदारांचेही आव्हानही आहे. दुसरीकडे, कन्नौजमध्ये विकास ‘सप’मुळे झाला असे मानणारा मोठा गट आहे. या मतदारसंघात यादव व मुस्लिम मतदारही सुमारे ४.५ लाख आहेत. या मतांवरही विजयाचे बरेचसे गणित अवलंबून आहे.
शिक्षणाचा अभाव
कन्नौजमध्ये सगळ्यात मोठी समस्या म्हणजे साक्षरतेचे प्रमाण कमी असणे. शिक्षण मिळवून येथे नोकरी मिळेल का, अशी साशंकता लोकांच्या मनात आहे. हिमांशू यादव या बारावीतील मुलाने पेपरफुटीबाबत रोष व्यक्त केला. पेपरफुटीमुळे माझ्या दोन भावंडांना मोठा धक्का बसला. त्यांनी खूप तयारी केली होती, ती पाण्यात गेली. कारवाईचा केवळ देखावा केला. म्हणूनच हे सरकार बदलायला हवे. ‘सप’च्या राज्यात रोजगारही मिळेल…, असे हिमांशू पोटतिडकीने सांगत होता.
प्रचाररंग
– अखिलेश यांची कन्या अदिती यादव कन्नौजमध्ये येणार असल्याने जय्यत तयारी सुरू होती.
– वस्तीच्या एका लहानशा मैदानात अनेक मुले, महिला हातात झेंडा घेऊन उभ्या होत्या.
– ‘सप’च्या कार्यालयांतही कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.
– अमित शहा यांची प्रचार रॅली असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्येही उत्साह दिसला.
– प्रचाराचे सामान घेऊन सभास्थळी त्यांनी गर्दी केली होती.