Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
West Bengal Politcs: प्रचारातून पूर्णपणे हरवला विकासाचा मुद्दा, पक्षांचा प्रचारात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप
देशातील उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांनंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा देणाऱ्या पश्चिम बंगालला वेगळे महत्त्व आहे. लोकसभेच्या ४२ जागा असलेल्या बंगालमध्ये सातही टप्प्यांत मतदान होत आहे. यातील तीन टप्प्यांतील मतदान झाले आहे. भाजपशासित राज्यांच्या तुलनेने विकासाची गती धीमी असल्याचा मुद्दा भाजपने मांडणे अपेक्षित होते. त्याऐवजी राज्यातील भ्रष्टाचार, महिला अत्याचार या मुद्द्यांवर भाजपचा अधिक भर दिसून येत आहे. राज्यात विकासकामांच्या नावाने अनेक ठिकाणी नारळ फोडण्यात आले. उद्घाटन-अनावरणाच्या फितीही कापल्या गेल्या. मात्र, त्या समारंभांमधील भाषणांचा रोख हा आरोप-प्रत्यारोप अशाच स्वरूपात राहिला. त्यास केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि राज्यात सत्ता असलेल्या तृणमूल काँग्रेस यापैकी कोणीही दूर राहू शकलेले नाही.
सन २०१९च्या लोकसभा निवडणुकीला पुलवामा दहशतवादी हल्ला आणि बालाकोट ‘सर्जिकल स्ट्राइक’ याची पार्श्वभूमी होती. देशाला व्यापून टाकणाऱ्या या मुद्द्यांचा भाजपला पश्चिम बंगालमध्येही लाभ झाला होता. यंदा मात्र तशी स्थिती नाही. भाजपने लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी म्हणजे ११ मार्च २०२४ पासून देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्याची घोषणा केली. या मुद्द्यावरून पश्चिम बंगालमधील राजकीय पक्षांमध्ये सरळ-सरळ दोन गट पडले आहेत. भाजपने समर्थन केलेल्या या कायद्याला ‘तृणमूल’ने थेट विरोध केला. अशीच विरोधाची भूमिका राज्यात तिसरा पर्याय म्हणून धडपडणाऱ्या काँग्रेस-डाव्या आघाडीचीदेखील आहे.
‘रेवडी’ आकर्षित करणार का?
देशातील ८० कोटी जनतेला पुढील पाच वर्षे मोफत धान्य देणारी भाजपची ‘गॅरंटी’ आहे. दुसरीकडे, ‘तृणमूल’नेही पाच किलो रेशनचे धान्य घरपोच, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत दहा सिलिंडर, ‘मनरेगा’ मजुरांना दररोज चारशे रुपयांची मजुरी, कायमस्वरूपी पक्की घरे, वृद्धांना दरमहा निवृत्तिवेतन अशा घोषणा केल्या आहेत. मतदारांना त्या किती आकर्षित करणार, याची उत्सुकता आहे.
‘तृणमूल’चे प्रचारातील मुद्दे
– ‘सीएए’द्वारे देशातील जनतेमध्ये विभाजनाचा भाजपचा डाव
– केंद्र सरकारकडून मनरेगा योजनेतील निधीची अडवणूक
– ‘संदेशखाली’च्या माध्यमातून राज्याच्या बदनामीचा प्रयत्न
– राज्यपालांच्या माध्यमातून सरकारच्या कारभारात हस्तक्षेप
– भाजपच्या भूमिकेमुळेच शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे नुकसान
– राज्यातील महिला, विद्यार्थ्यांना विविध सुविधा देण्याची घोषणा
भाजपच्या प्रचाराचे मुद्दे
– ‘संदेशखाली’च्या निमित्ताने राज्यातील गुंडाराजचा पर्दाफाश
– ममता बॅनर्जी यांचे सरकार देशातील सर्वाधिक भ्रष्टाचारी
– तृणमूल काँग्रेसची गुन्हेगारांना संरक्षण देणारी भूमिका
– ‘सीएए’विरोधातून ममतांचा देशविरोधी चेहरा उघड
– तृणमूल सरकारकडून शिक्षण विभाग कर्मचाऱ्यांची फसवणूक
– बांगलादेशातील घुसखोरांना संरक्षण देण्याचा ममता यांचा डाव