Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘राहुल गांधींना रोखण्यासाठी भाजपसोबत आतून हातमिळवणी करतात हे पक्के झाले’

15

हायलाइट्स:

  • पंजाब काँग्रेसमध्ये गोंधळ
  • अमरिंदरसिंग पक्ष सोडण्याच्या तयारीत
  • शिवसेनेनं व्यक्त केली प्रतिक्रिया

मुंबईः ‘जुने वतनदार नव्या लोकांना संधी मिळू देत नाहीत. वाडा पडका झाला असला तरी त्यातील खिडक्या, दरवाजे, पंखे, पलंग, झुंबरावर मालकी हक्क सांगून त्या वाड्यातच ते पथारी पसरून बसले आहेत. राहुल गांधी (Rahul gandhi) वाड्याची डागडुजी करु इच्छितात. वाड्यात रंगरंगोटी करु पाहतात, गळकी भोके बुजवू पाहतात. पण जुने लोक राहुल गांधींना ते करु देत नाहीत. राहुल गांधी रोखण्यासाठी हे लोक आतून भाजपसारख्या पक्षाशी हातमिळवणी करतात हे आता पक्के झाले आहे. काँग्रेस (Congress) बुडवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतली,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे. तसंच, काँग्रेसला कायमस्वरुपी अध्यक्ष द्या, पक्षाला सेनापतीच नाही तर लढायचे कसे?, असा सवालही शिवसेनेनं केला आहे.

पंजाब काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनीही काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळं काँग्रेस सध्या अडचणीत सापडली आहे. यावर शिवसेनेनं काँग्रेसचं कुठे चुकतंय यावर भाष्य केलं आहे. तसंच, काँग्रेसला कायमस्वरुपी अध्यक्ष द्यावा, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

वाचाः परमबीर सिंग यांचे पलायन?; अटकेच्या भीतीने देश सोडून गेल्याचा संशय

‘काँग्रेस श्रेष्ठींनी कॅ. अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर केले. नवे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि त्यांचे नवे मंत्रिमंडळ सत्तेवर आले. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी या बदलानंतर पेढे वाटले. आनंदाने त्यांनी भांगडा केला, पण या उठवळ, बेभरवशाच्या सिद्धू यांनीच आता प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसपुढील संकट वाढवले आहे. सिद्धू यांच्या सततच्या कटकटीमुळे कॅ. अमरिंदर यांना दूर केले गेले. आता सिद्धूही गेले. काँग्रेसच्या हाती काय उरले?,’ असा सवाल शिवसेनेनं केला आहे.

पंजाबातील गोंधळात भाजपचा हात आहे तसा काँग्रेस नेतृत्वाचाही गोंधळ आहे. काँग्रेस पक्षाला कायमस्वरूपी अध्यक्ष नाही व हंगामी स्वरूपाचे काम सुरू आहे. पंजाबात दलित मुख्यमंत्री करून राहुल गांधी यांनी एक जोरदार पाऊल टाकले ते त्यांच्या प्रिय सिद्धूने अडकवले. काँग्रेस पक्षात मूळच्याच बोलघेवड्यांची कमी नसताना सिद्धूसारख्या उपऱ्या बोलघेवड्यांवर फाजील विश्वास टाकण्याची गरज नव्हती. पंजाबातील गोंधळाचे पडसाद आता इतर राज्यांतही उमटू शकतात,’ अशी शक्यता शिवसेनेनं व्यक्त केली आहे.

वाचाः देशमुख प्रकरणात मोठे अपडेट्स; ‘या’ २ प्रमुख अधिकाऱ्यांना CBIने बोलावले

‘काँग्रेसला कायमस्वरूपी अध्यक्ष द्या. पक्षाला सेनापतीच नाही तर लढायचे कसे? ही जुन्याजाणत्या काँग्रेसवाल्यांची मागणीही चुकीची नाही. काँग्रेस पक्षात नेता कोण, हा प्रश्न आहेच. गांधी परिवार आहे. पण नेता कोण? अध्यक्ष कोण? याविषयी भ्रम असेल तर तो दूर करायला हवा. एखादा बडा नेता पंजाबात जाऊन बसेल व मामला खतम करेल असा कोणी आहे काय?, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

‘काँग्रेस पक्षाने उसळी मारून उठावे, मैदानात उतरावे, नवचैतन्याची बहार राजकारणात आणावी अशी लोकभावना आहे. त्यासाठी काँग्रेसला आधी पूर्णवेळ अध्यक्ष हवाच. डोकेच नसेल तर शरीराचा काय फायदा? सिद्धू, अमरिंदर यांची मनधरणी करण्यात अर्थ नाही. पंजाबात काँग्रेस फोडून भाजपास विधानसभा गिळायची आहे, हा विनोदच म्हणावा लागेल. काँग्रेसशिवाय भाजपासही जिंकता येत नाही आणि भाजपासही काँग्रेसचे टॉनिक लागते. पण हे काँग्रेस नेतृत्वास कधी उमगणार?,’ असा सवाल शिवसेनेनं केला आहे.

वाचाः साताऱ्यात दोन्ही राजेंना पुन्हा आव्हान? राष्ट्रवादीच्या गोटात नव्या हालचाली

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.