Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे, दि. १२: जिल्ह्यातील मावळ, पुणे व शिरुर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सोमवार १३ मे रोजी होत असून पुणे लोकसभेअंतर्गत वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट व कसबा पेठ विधानसभा मतदार संघ अशा सहा ठिकाणांहून जिल्हाधिकारी तथा पुणे लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले.
प्रत्येक ठिकाणी मतदान केंद्रनिहाय टेबलची व्यवस्था करण्यात आली होती. साहित्य घेण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी दर्शनी भागातील फलकाद्वारे माहिती देण्यात आली. साहित्य वितरण केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदान कर्मचाऱ्यांना यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. साहित्य ताब्यात घेतल्यानंतर मतदान केंद्रांपर्यंत जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.
वडगावशेरी विधानसभा मतदार संघातील साहित्य वितरण स्व. राजाराम भिकू पठारे स्टेडियम, खराडी येथे करण्यात आले. साहित्य वितरणासाठी १०५ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. एकूण १५ टेबलद्वारे ४५३ कंट्रोल युनीट व व्हीव्हीपॅट आणि १ हजार ३५९ बॅलेट युनीटचे वितरण करण्यात आले. साहित्य मतदान केंद्रांपर्यंत घेऊन जाण्यासाठी १०६ वाहनांची सोय करण्यात आली.
शिवाजीनगर मतदार संघासाठी बॅडमिंटन हॉल, कृषी महाविद्यालय येथे साहित्य वितरण करण्यात आले. वितरणासाठी १४० कर्मचारी तसेच नियंत्रण पथक नियुक्त करण्यात आले होते. साहित्य वाटपासाठी नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी २८ टेबलद्वारे नेमून दिलेल्या मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांची हजेरी घेऊन मतदान केंद्राध्यक्ष व संबंधित मतदान अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात आलेली ८४० बॅलेट युनिट व २८० कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट ८१ वाहनांमधून मतदान केंद्राकडे पाठविण्यात आले.
कोथरुड मतदार संघासाठी विश्वशांती गुरुकुल विद्यालय, एमआयटी संस्था, पौड रोड येथे ४० टेबलद्वारे १ हजार १९१ बॅलेट युनिट,३९७ कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट वितरीत करण्यात आले. साहित्य वितरण वाहतूक व्यवस्थापनासाठी २५० कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. ७० बस, ६ मिनी बस, १९ जीप अशा एकूण ९५ वाहनांची सोय करण्यात आली होती.
पर्वती मतदार संघासाठी शेठ दगडुराम कटारिया महाविद्यालय, महर्षीनगर येथे ३४ टेबलवर साहित्यांचे वितरण करण्यात आले. यासाठी ११० अधिकारी व कर्मचारी तसेच ७५ वाहनांची सोय करण्यात आली होती. पर्वती मतदार संघात १ हजार ३२ बॅलेट युनिट, ३४४ कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅटचे वितरण करण्यात आले.
पुणे कॅन्टोन्मेंटसाठी अल्पबचत भवन येथे २८ टेबलवर ११२ कर्मचाऱ्यांकडून साहित्य वितरण करण्यात आले. २२७ कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट आणि ८२२ बॅलेट युनिटचे वितरण करण्यात आले. त्यासाठी ६४ वाहनांची सोय करण्यात आली होती.
कसबा पेठ मतदार संघासाठी गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट याठिकाणी २७ टेबलवरुन साहित्य वितरण करण्यात आले. प्रत्येक टेबलवर एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला होता. साहित्य पोहोचवण्यासाठी ८१ वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. ८१० बॅलेट युनिट, २७० कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅटचे वितरण करण्यात आले.
पुणे लोकसभेसाठी २ हजार १८ मतदान केंद्रावर मतदान होणार असून सर्व मतदान केंद्रांवर किमान आश्वासित सुविधा, औषधोपचार किट, शारीरिक विकलांग मतदार, ज्येष्ठ नागरिक मतदार यांना मदत करण्यासाठी तसेच केंद्रावरील रांगांचे व्यवस्थापनात सहाय्य करण्यासाठी स्वयंसेवक, ज्येष्ठ, दिव्यांगांसाठी व्हीलचेअर तसेच मतदान केंद्रापर्यंत येण्यास सक्षम नसलेल्या मतदारांनी मागणी केल्यास घरुन मतदान केंद्रापर्यंत आणणे व मतदानानंतर घरी सोडण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अधिकाधिक पात्र मतदारांनी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन डॉ. दिवसे यांनी केले आहे.