Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सभा आटोपल्यानंतर फूटबॉल स्टेडिअममधून ‘तृणमूल’च्याच नव्हे, तर सर्वसामान्य महिलाही ध्वनिक्षेपकावरील गाण्याच्या तालावर नाचत नाचत बाहेर पडतात. बाहेरील दुकानांवर गप्पा मारताना कुल्लडमधील गरम चहाचा एकेक घोट घेतात. सोबतीला टोस्ट, बिस्कीट, कुकीज चवीचवीने खातात आणि एकमेकांना टाटा-बायबाय करत आपल्या गावातून आलेल्या टुकटुकमध्ये बसून घराच्या दिशेने वळतात. हे सर्व काही स्टेडिअमच्या गेटजवळ आपली ३०-३५ वर्षे जुनी २४ इंची सायकल घेऊन उभे असलेले मुखर्जी बघत असतात. ‘ममताजी की महिलाओ में क्रेझ है ना?’ असे त्यांना हिंदीतून विचारले. त्यावर ‘ममता गोनोनार भिट्टी चोल्लीस परसेंट’ अशा एका वाक्यात वयाची साठी पार केलेले मुखर्जी ‘तृणमूल’च्या निवडणूक विजयाचे गणित उलगडतात. त्यांच्या वाक्याचा मराठी अनुवाद म्हणजे ‘ममता यांचे राजकारण ४० टक्क्यांवर आधारलेले आहे.’ आता यातील ४० टक्के शब्द ऐकल्यावर कोणाचेही कान टवकारले जातील. मात्र, हे ४० टक्के म्हणजे एकूण मतदानातील ममतांच्या वाट्याला येणारे मताधिक्य. यात गेल्या बारा वर्षांत किरकोळ बदल झाला. पण ते ४० टक्क्यांच्या खाली आतापर्यंत तरी गेलेले नाही. ते कायम राखण्याचे ‘तृणमूल’पुढे आताही आव्हान आहे. त्यासाठीच पक्षाने आपल्या बूथ कार्यकर्त्यांना कडक निर्देश दिले आहेत.
कमिशनखोरीचा आरोप
राज्यात केंद्रातील कोणतीही योजना राबवू दिली जात नाही, असा भाजपचा आरोप आहे. हुगळीत खासदार लॉकेट चॅटर्जी यांची पत्रके घरोघरी वाटणारा बंटी सांगतो, की ‘अरे, ममताजी का सबसे करप्ट सरकार है। अब देखो ना कितना सब घोटाला किये है? कमिशन नहीं दिया तो लोगों को भगा देते हैं टीएमसीवाले!’ खासदार लॉकेट यांच्या माहितीपत्रकांसोबत ‘आयुष्यमान कार्ड’च्या अर्जांचे वाटप केले जात आहे. ‘हे सर्व अर्ज भरून आम्ही लोकांना आयुष्यमान कार्ड घरपोच आणून देणार आहोत, असे तो सांगतो.
काय आहे मतांचे गणित?
राज्यात ३० ते ३५ टक्के मुस्लिम मते आहेत. ममता यांना या मतांची नेहमीच मदत झाली आहे. दुसरीकडे, जवळपास ५० टक्के महिला मतदार आहेत. यात घट जरी झाली तरी मुस्लिम आणि महिला मिळून ४० टक्के मते आपल्या पदरात पाडण्याचा ममता यांचा भर आहे. ती मते जरी मिळाली तरी त्यांचे विजयाचे गणित सोपे होत जाते. यात महिलांसाठीची लखिर भंडार योजना ममतादीदींचे मुख्य अस्र आहे. ही योजना बंद करण्याचा भाजपचा डाव असल्याचा दावा ‘तृणमूल’कडून केला जात आहे.