Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
नाशिक, दि. १६ मे, २०२४ (जि. मा. का. वृत्तसेवा) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पाचव्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील २० दिंडोरी व २१ नाशिक लोकसभा मतदारसंघात येत्या २० मे रोजी मतदान होत आहे. मा. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करत निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी, निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडावी, असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आज येथे दिले.
मध्यवर्ती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघ निवडणूक विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी तथा नाशिक लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या नोडल अधिकारी आशिमा मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी तथा दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्यासह सर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी, नोडल अधिकारी उपस्थित होते.
मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम म्हणाले, मतदानाची टक्केवारी वाढावी, यावर लक्ष केंद्रित करून आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत. भारत निवडणूक आयोगाकडूनही मतदानासाठी आवाहन करणारे मेसेज केले जात आहेत. मतदान केंद्रे आवश्यक सोयी सुविधांनी सज्ज ठेवावीत. व त्याबाबत मतदारांमध्ये पुरेशी जनजागृती करावी. दिव्यांग मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी आवश्यक सुविधा देण्यात याव्यात. एकाच ठिकाणी एकापेक्षा जास्त मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी मतदारांसाठी प्रतिक्षा कक्षाची व्यवस्था करण्यात यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, कमी मतदान असलेल्या मतदान केंद्रांवर लक्ष केंद्रित करून हे प्रमाण वाढविण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, आशा वर्कर्स अशा ग्रामस्तरावरील कर्मचाऱ्यांना विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना द्याव्यात. मतदानादिवशी पाऊस आला तर पर्यायी नियोजन तयार ठेवावे. मतदार माहिती स्लीप आणि माहिती पत्रकाचे वाटप वेळेवर करावे. मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी आवश्यक प्रयत्न करावेत. तसेच मतदार यादीत नाव न सापडण्याच्या तक्रारींचे निराकरण तात्काळ करावे. त्याच ठिकाणी मतदार यादीत नावाच्या समावेशाबाबतचा अर्ज भरून घ्यावा, जेणे करून विधानसभा निवडणुकीवेळी असे प्रकार रोखले जातील, मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम यांनी सांगितले.
एस. चोक्कलिंगम म्हणाले, ईव्हीएम मशीन संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करावी. मतदान केंद्रांवर प्रतिबंधित वस्तू जाणार नाहीत, यासाठी दक्ष राहावे. सी-व्हिजिलवर प्राप्त तक्रारींचे १०० मिनिटात निराकरण करावे, मतदान संबंधी सर्व अहवाल अचूक व वेळेत सादर करावेत. वेबकास्टिंगद्वारे नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवावे, मेडिकल इमर्जन्सी आल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांची समन्वयक म्हणून नेमणूक करावी, असे त्यांनी सांगितले.
निवडणूक विषयक नियमांचे उल्लंघन कोणत्याही घटकाद्वारे होऊ नये यासाठी पोलीस विभागासोबत सर्व संबंधित विभागांनी दक्ष राहावे.असे सांगून श्री. चोक्कलिंगम् म्हणाले, निवडणूक प्रक्रिया सुरू असताना कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही यावर विशेष लक्ष ठेवावे. कोठेही अशी घटना लक्षात आल्यास वेळीच उपाययोजना कराव्यात. निवडणुकीत पैसा, मद्य तसेच इतर कोणत्याही स्वरुपातील आमिषाचे वाटप तसेच बळाचा वापर होऊ नये यासाठी विशेष लक्ष द्यावे. मतदानाच्या काळात सोशल मीडियावर प्रसारीत होणाऱ्या व गैरसमज पसरविणाऱ्या संदेश व इतर घटनांवर बारकाईने लक्ष ठेवून अशा घटनांचे त्वरित खंडन करणे आवश्यक आहे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील निवडणूक तयारीची माहिती दिली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि पोलीस अधीक्षक (ग्रामीण) विक्रम देशमाने यांनी पोलीस विभागाने केलेल्या तयारीची माहिती दिली.
बैठकीपूर्वी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम् यांनी केंद्रीय वखार महामंडळ गोदाम अंबड येथे भेट देऊन स्ट्राँग रूम व मतमोजणीसाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती घेतली.
00000