Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
बाळ्यामामांनी २००९ च्या निवडणुकीत भिवंडी पश्चिम मतदारसंघात कट्टर शिवसैनिकाला डावलून तिकीट मिळवलं खरं, पण त्यांचा दारूण पराभव झाला. तर २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांचं डिपॉझिट जप्त झालं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते शिवसेनेत राहून, तर यावेळच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात राहून कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होते. त्यामुळे त्यांच्याकडे पक्षश्रेष्ठींकडून कायम संशयाने पाहिले जाते, असं म्हणत कपिल पाटील यांनी बाळ्यामामांना पलटूराम असा टोलाही लगावला.
दोन वेळा शिवबंधन झुगारून बाळ्यामामा यांनी शिवसेना सोडली होती. त्यामुळे या मतदारसंघातल्या शिवसैनिकांचाही या उमेदवारीला विरोध असल्याचं कपिल पाटील म्हणाले. दुसरीकडे २०२४ च्या निवडणुकीत कॉंग्रेसची जागा पळविल्यामुळे बाळ्यामामांवर कॉंग्रेसचे स्थानिक नेतेही नाराज आहेत. बाळ्यामामा यांच्याकडून नेते आणि कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता स्वत: निर्णय लादले जातात. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे भिवंडीत मनोमिलन झाले नाही. इतकेच नव्हे तर शरद पवार यांच्या सभेलाही गर्दी झाली नाही, अशी टीका कपिल पाटील यांनी केली.
कपिल पाटील पुढे म्हणाले, “बाळ्यामामा यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यांच्याविरोधात शेतकऱ्यांची फसवणूक, धमक्या देण्याबाबत अनेक गुन्हे दाखल होते. त्यांनी गोदामांच्या व्यवहारातही गरीब शेतकऱ्यांची फसवणूक केल्याच्या तक्रारी आहेत. अवघ्या १० वर्षांत त्यांच्यावरील सर्वच्या सर्व गुन्हे रद्द झाल्याचा चमत्कार झाल्यामुळे जनतेत आश्चर्य व्यक्त होत आहे. आतापर्यंतच्या प्रचारात ते स्वत:च्या राजकीय कारकीर्दीत स्वत: केलेले एकही काम जनतेला सांगू शकले नाहीत.”
दरम्यान, भिवंडीची ही निवडणूक गोदामांच्या राजकारणावरुन चांगलीच चर्चेत आलीय. बाळ्यामामांनी अनेकदा पक्ष बदललेला असतानाही त्यांना ऐनवेळी तिकीट मिळाल्यामुळे या मतदारसंघात आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. कपिल पाटलांनीही याच मुद्द्याला हात घातलाय आणि बाळ्यामामांवर प्रहार केला.