Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

निवडणूक साहित्यासह कर्मचारी मतदान केंद्रावर पोहोचले

11

धुळे, दि. १९ (जिमाका) :  निवडणूकीचा उत्सव अर्थात 18 वी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची मतदान प्रकिया सात टप्प्यात पार पडत आहे. राज्यातील पाचव्या टप्प्यात 02-धुळे लोकसभा मतदार संघासाठी आज सोमवार, 20 मे, 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेसाठी पोलीस बंदोबस्त व राखीव कर्मचाऱ्यांसह एकूण 17 हजार 341 मतदान कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक विधानसभा क्षेत्राच्या मुख्यालयापासून रविवार सकाळी मतदान साहित्य घेवून अधिकारी, कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर पोहोचले आले. आज सोमवार, दि. 20 रोजी सकाळी 7 वाजेपासून सहा विधानसभा मतदार संघात मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांचेसह विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

02-धुळे लोकसभा मतदार संघात 18 व्या लोकसभेच्या सार्वत्रिक मतदानासाठी पाचव्या टप्प्यातील निवडणूक प्रकिया पार पडणार आहे. जिल्ह्यात धुळे मतदार संघात 1 हजार 969 मतदान केंद्रांवर संबधीत विधानसभा क्षेत्रनिहाय इव्हिएम, बॅलेट मशीन, व्हिव्हीपॅट, बॅटरी युनिट, मतदान कक्ष बॉक्स आदी मतदान साहित्यासह नेमून दिलेल्या एसटी बस, स्कूल बस वा अन्य नियोजित वाहनाने नियुक्त केलेल्या मतदान केंद्रांवर कर्मचारी पोहोचले आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघात 1969 मतदान केंद्र

धुळे लोकसभा मतदारसंघात 1 हजार 948 मुळ मतदान केंद्र तर 21 सहाय्यकारी मतदान केंद्र असे एकूण 1 हजार 969 मतदान केंद्र आहेत. त्यात धुळे ग्रामीण 375, धुळे शहर 280, सहाय्यकारी मतदान केंद्र 8, शिंदखेडा 338, मालेगाव मध्य 343 सहाय्यकारी मतदान केंद्र 2, मालेगाव बाहृय 337, सहाय्यकारी मतदान केंद्र 6, तर बागलाण विधानसभा मतदार संघात 288 मतदान केंद्र सहाय्यकारी मतदान केंद्र 5 आहेत. या सर्व मतदान केंद्रांवर निवडणूकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य वितरीत करण्यात आले. 986 मतदान केंन्द्रावर वेबकॉस्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच 13 मतदान केंद्र शॅडो मतदान केंद्र आहेत.  याठिकाणी वॉकीटॉकीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी 153 झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून 17 अतिरिक्त अधिकारी राखीव ठेवण्यात आले आहे.

सहा मतदारसंघात 20 लक्ष 22 हजार 61 मतदार

धुळे लोकसभा मतदार संघात एकूण 20 लक्ष 22 हजार 61 मतदार आहेत. त्यात धुळे ग्रामीण  विधानसभा मतदार संघात 2 लाख 3 हजार 939 पुरुष मतदार तर 1 लाख 89 हजार 558 महिला मतदार व 1 तृतीयपंथी तसेच 1067 सैनिक मतदार आहेत. तर धुळे शहर विधानसभा मतदार संघात 1 लाख 79 हजार 568 पुरुष मतदार तर 1 लाख 64 हजार 226 महिला मतदार व 27 तृतीयपंथी तसेच 332 सैनिक मतदार आहेत. शिंदखेडा विधानसभा मतदार संघात 1 लाख 69 हजार 648 पुरुष मतदार तर 1 लाख 62 हजार 196 महिला मतदार व 1 तृतीयपंथी तसेच 530 सैनिक मतदार आहेत. मालेगांव मध्य विधानसभा मतदारसंघात 1 लाख 57 हजार 512 पुरुष मतदार तर 1 लाख 44 हजार 871 महिला मतदार तर 8 तृतीयपंथी तसेच 75  सैनिक मतदार आहेत. मालेगांव बाहृय विधानसभा मतदारसंघात 1 लाख 89 हजार 468 पुरुष मतदार तर 1 लाख 71 हजार 339 महिला मतदार व 8 तृतीयपंथी तसेच 689 सैनिक मतदार आहेत. तर बागलाण विधानसभा मतदारसंघात 1 लाख 51 हजार 793 पुरुष मतदार तर 1 लाख 37 हजार 896 महिला मतदार व 2 तृतीयपंथी तसेच 521 सैनिक मतदार आहेत. सहाही विधानसभा मतदारसंघात 12 हजार 76 दिव्यांग मतदार असून या मतदार संघातील सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी रॅम्पची व्यवस्था उपलब्ध आहे. तसेच मदतीसाठी  1 हजार 48 स्वंयसेवकाची नियुक्ती केली आहे.

मतदारांसाठी मतदान केंद्रांवर आरोग्य व अत्यावश्यक सुविधा

निवडणूक मतदानासाठी प्रशासन सर्वतोपरी सिद्ध झाले आहे. मतदार संघात तापमानाची परिस्थिती लक्षात घेता प्रत्येक मतदान केंद्रावर ज्येष्ठ, गर्भार महिला, लहान बालकांच्या माता असलेल्या महिला मतदारांसाठी व लहान मुलांसाठी पाळणाघर आदी व्यवस्था असून अंगणवाडी, बालवाडी सेविका, मदतनीस तैनात केलेल्या आहेत. तसेच अन्य मतदारांसाठी उन्हाचा त्रास होउ नये म्हणून सावलीसाठी मंडप, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, आपत्कालीन प्रसंगी रूग्णवाहिका आदी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघामधून 18 उमेदवार निवडणूक रिंगणात

धुळे लोकसभा मतदार संघात 18 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर दोन इव्हीएम चा वापर केला जाणार आहे.

24 आदर्श, सखी महिला, युवा, दिव्यांग मतदान केंद्राची निर्मिती

या निवडणूकीत मतदार संघातील विधानसभा क्षेत्रनिहाय प्रत्येकी एक आदर्श, सखी महिला, युवा, दिव्यांग मतदान केंद्र याप्रमाणे संपूर्ण लोकसभा मतदार संघात 24 मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. याठिकाणी मतदान केंद्रानुसार, महिला, युवा व दिव्यांग अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. धुळे शहरात मतदान केंद्र क्रमांक 121 गरुड प्राथमिक शाळा पारोळा रोड, धुळे दक्षिणेकडील इमारत पश्चिमेकडील खोली क्रमांक दोन येथे आदर्श मतदान केंद्र, मतदान केंद्र क्रमांक 51 उन्नती शाळा देवपूर धुळे पुर्वेकडील खोली क्र 3 येथे महिला संचलित मतदान केंद्र, मतदान केंद्र क्रमांक 9  एकविरा विद्यालय देवपूर,धुळे उत्तरेकडील इमारत पश्चिमेकडून खोली क्रमांक2 येथे युवा संचलित मतदान केंद्र, मतदान केंद्र क्रमांक 70 महाराणा प्रताप शाळा देवपूर धुळे दक्षिणेकडील इमारत खेाली क्रमांक 1 येथे दिव्यांग संचलित मतदान केंद्र स्थापित केले आहे.

मतदान केंद्रांवर मोबाईलला बंदी

 मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, कार्डलेस फोन, वायरलेस सेटसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वापरास, बाळगण्यास निर्बंध आहेत. मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मोबाईल वापरता येणार नाही. त्यामुळे समूहाने मतदानासाठी जाणाऱ्या मतदारांना मोबाईल मतदान केंद्राच्या बाहेरच ठेऊन जावे लागणार आहे. किंवा एकमेकांजवळ सांभाळायला द्यावे लागणार आहे.

सर्व सोयींनी परिपूर्ण असणार मतदान केंद्र

   धुळे लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदार संघात उभारण्यात आलेल्या 1969 मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी मतदान केंद्रावर परिपूर्ण सोयी करण्यात आल्या आहेत. त्यात पिण्याचे पाणी, उन्हापासून बचाव करण्यासाठी मंडप किंवा शेड, मतदार सहाय्य्यता केंद्र, उन्हाळयातील वाढते तापमान लक्षात घेऊन प्रथमोपचार पेट्या, आणि प्रत्येक मतदान केंद्रासाठी ओआरएसचे पाकिटे तसेच आरोग्याशी संबंधित अडचणीसाठी आरोग्य केंद्र, अंगणवाडी व बालसंगोपन केंद्र, व्हीलचेअर या सह सर्व प्रकारच्या पूरक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

पोलीस प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था

सोमवारी 20 मे रोजी लोकसभा निवडणूकीसाठी मतदान होत आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुव्यवस्थितरित्या व शांततेत पार पडावी, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाकडून देखील पुर्ण तयारी करण्यात आली आहे. यात प्रत्येक ईव्हीएम मशीन सोबत एक पोलीस आणि होमगार्ड तैनात आहेत. तसेच मतदान केंद्राच्या बाहेर 100 मिटर अंतरावर देखील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. याशिवाय बाहेरील कर्नाटक तसेच केरळ राज्यातून अतिरिक्त पोलीस कुमक बंदोबस्तासह मुंबई लोहमार्ग पोलीस बलासह अन्य जिल्ह्यातून देखील पोलीस व होमगार्डस पथक दाखल झाले आहेत. सर्व विधानसभा मतदार संघात पोलीस दलाचा रुटमार्च करण्यात आला आहे. क्रीटीकल व गर्दीच्या मतदान केंद्र परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गृहभेटीद्वारे जनजागृती व मतदार चिठ्ठीचे वाटप

या निवडणूकीत मतदानाचा टक्क वाढावा, याकरीता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपचे जिल्हा नोडल अधिकारी विशान नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोगाच्या सुचनांनुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागात तर धुळे महापालिकेच्या आयुक्त अमिता दगडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरी भागात अधिकारी, कर्मचारी यांनी गृहभेटीद्वारे नागरीकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती केली असून या मतदार संघात बीएलओ मार्फत 19 लाख 18 हजार 831 मतदारांना मतदार चिठ्ठीचे वाटप करण्यात आले असून 4 लाख 80 हजार 877 घरांना वोटर गाईडचे वाटप करण्यात आले आहे.

मतदानाच्या दिवशी देखरेखीसाठी वॉर रुमची व्यवस्था

धुळे लोकसभा मतदार संघातील मतदान प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रुमची स्थापना करण्यात आली आहे. याठिकाणी मतदानाच्या दिवसाचे अहवाल, ईव्हीएमबाबतचे अहवाल, कंट्रोल रुम, मिडीया कंट्रोल रुम, मतदार समस्या निवारण कक्ष (1950 टोल फ्री), आचारसंहिता कक्ष, वेब कास्टिंग, जीपीएस मॉनिटरिंग कंट्रोल रुम, सायबर सेल, तक्रार हाताळण्याची व्यवस्था (सी व्हीजील कक्ष) आदि तैनात ठेवण्यात आले आहे. याद्वारे संपूर्ण मतदार संघातील घडामोडींवर नजर ठेवण्यात येणार आहे.

1853 गृह मतदान, अत्यावश्यक सेवा व इटीपीबीएमएस मतदारांनी केले मतदान

निवडणूक आयोगाने या निवडणूकीपासून प्रथमच 85 वर्षावरील ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यानुसार मतदार संघात 390 गृह मतदार, 1275 अत्यावश्यक सेवेतील मतदार तर 188 इटीपीबीएमएस असे एकूण 1853 मतदारांना आतापर्यंत मतदान केले आहे.

नागरिकांनी निर्भयपणे मतदानाला यावे

02-धुळे लोकसभा मतदार संघात आज दि. 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदानासाठी घराबाहेर पडावे. प्रशासनातर्फे मतदान केंद्रावर सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्या सोबतच जिल्ह्यात निर्भयपणे मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी प्रशासनाने सर्व प्रकारची दक्षता घेतली आहे. मतदारांनी लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होऊन आपला हक्क बजवावा व मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.

०००

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.