Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
बारामुल्ला येथे आज, सोमवारी मतदान होत आहे. अनंतनाग-राजौरी मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाच एका मागोमाग एक हल्ले होत आहेत. नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आणि भाजप या पक्षांनी या हल्ल्यांचा निषेध केला आहे. माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती या अनंतनाग-राजौरी येथून निवडणूक लढत आहेत. ‘पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. या हल्ल्यात दोन पर्यटक जखमी झाले आहेत. तसेच हिरपोरा येथील (माजी) सरपंचावरही हल्ला झाला आहे. या हल्ल्यांची वेळ चिंता वाढविणारी आहे’, असे मुफ्ती यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.
नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला आणि उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनीही या दहशतवादी हल्ल्यांचा निषेध केला आहे. ‘अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले हे जम्मू-काश्मीरमध्ये दीर्घकालीन शांतता प्रस्थापित करण्यामध्ये एक मोठा अडथळा ठरतात’, असे पक्षाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सर्वतोपरी मदतीच्या सूचना
जयपूर : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या फरहा आणि तबरेज जयपूरमधील जोडप्याला आवश्यक ती सर्व मदत करण्यात यावी, अशा सूचना राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या दाम्पत्याच्या कुटुंबीयांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून मदतीचे आश्वासन देण्यात आल्याचे सांगण्यात आले. फरहा आणि तबरेज आपल्या दोन मुलांसह पर्यटनासाठी काश्मीरमध्ये आले होते.
दरम्यान, भारतीय जनता युवा मोर्चाच्या (बीजेवायएम) पदाधिकाऱ्यांनी एजाज शेख यांच्या हत्येच्या निषेधार्थ रविवारी दहशतवाद्याचा पुतळा जाळून निषेध केला.