Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

निवडणूक लढवण्यात महिलांची उदासीनता; सहाव्या टप्प्यात केवळ ११ टक्के महिला उमेदवार रिंगणात

11

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी होणाऱ्या सहाव्या फेरीत एकूण ८६९ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी ८६६ जणांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केले असता यातील १८० जणांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत व ३३८ उमेदवार कोट्यधीश असल्याचे आढळले आहे. निवडणूक लढविण्याबाबत महिलांची उदासीनता कायम असून या टप्प्यातील ९२ म्हणजे केवळ ११ टक्के महिला उमेदवार आहेत.

नुकतेच भाजपमध्ये आलेले, हरयाणाच्या कुरूक्षेत्रातील नवीन जिंदाल हे या टप्प्यातील सर्वांत श्रीमंत उमेदवार (१२४१ कोटी रुपये घोषित संपत्ती) आहेत. याच मतदारसंघातील आप-काँग्रेस युतीचे सुशीलकुमार गुप्ता (१६९ कोटी) हेही सर्वाधिक तीन श्रीमंत उमेदवारांत असल्याने कुरूक्षेत्र हा सर्वांत श्रीमंत उमेदवारांचा मतदारसंघ ठरला आहे.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रीफॉर्म्सने (एडीआर) सहाव्या टप्प्यात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केले. या टप्प्यात २७१ (३१ टक्के) उमेदवार २५ ते ४० वयोगटातील आहेत. ४३६ (५० टक्के) उमेदवार ४१ ते ६० वयोगटातील आहेत. ५९ (१८ टक्के) जण ६१ ते ८० वयोगटातील आहेत. ज्या १८० (२१ टक्के) उमेदवारांनी स्वत:वर फौजदारी गुन्हे दाखल असल्याचे म्हटले, त्यातील १४१ (१६ टक्के) जणांवर गंभीर गुन्हे आहेत. १२ जण गुन्हेगारी खटल्यांत दोषी सिद्ध झाले आहेत.

सहा जणांविरुद्ध हत्येचे (कलम ३०२) व २१ जणांवर हत्येच्या प्रयत्नांचे गुन्हे (कलम ३०७) आहेत. २४ उमेदवारांवर महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत व त्यातील तिघांवर बलात्काराचे गुन्हे (कलम ३७६) आहेत. द्वेषपूर्ण भाषणे करणाऱ्या १६ जणांवरही गुन्हे दाखल आहेत.

पक्षनिहाय आकडेवारी

सहाव्या टप्प्यातील आपचे सर्व पाच आणि राष्ट्रीय जनता दलाच्या चारही उमेदवारांवर गुन्हे आहेत. समाजवादी पक्षाच्या १२पैकी ९, भाजपच्या ५१पैकी २८, काँग्रेसच्या २५पैकी आठ, तृणमूलच्या नऊपैकी चार व बिजू जनता दलाच्या ३९पैकी दोन उमेदवारांनी आपल्यावर गुन्हे दाखल असल्याचे म्हटले आहे.

कोट्याधीश अनेक

सहाव्या टप्प्यात भाजपचे सर्वाधिक ४८ उमेदवार कोट्यधीश आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसच्या २० उमेदवारांनीही आपल्याकडे किमान एक कोटीहून अधिक संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. प्रत्येक उमेदवाराकडे सरासरी ६ कोटी २१ लाख रुपयांची संपत्ती आहे. जिंदाल यांच्या पाठोपाठ ओडिशाच्या कटकचे बिजद उमेदवार सत्राप्त (४८२ कोटी) यांचा क्रमांक आहे.

१३ उमेदवार निरक्षर

या टप्प्यातील ३३२ (३८ टक्के) उमेदवार पाचवी ते बारावीदरम्यान शिक्षण झालेले आहेत. सर्वाधिक ४८७ (५६ टक्के) उमेदवारांनी पदवी व त्यावरील शिक्षण घेतल्याचे जाहीर केले आहे. २२ उमेदवार पदविकाधारक आहेत. १२ जण केवळ साक्षर आहेत, १३ उमेदवार निरक्षर आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.