Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
काँग्रेसकडून नेहमीच राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वाचे उल्लंघन
सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदी यांनी केलेली भाषणे वेगवेगळ्या धर्मांत फूट पाडणारी, तसेच धार्मिक ध्रुवीकरणास प्रोत्साहन देणारी आहेत, असा आरोप विरोधकांकडून होत आहे. या विधानांमुळे अल्पसंख्याकांच्या मनात संशय निर्माण होत नसेल का, असे विचारले असता त्यांनी ही भूमिका मांडली. मी आजवर कधीही अल्पसंख्याकांविरोधात बोललेलो नाही. मी केवळ काँग्रेसच्या मतपेढीच्या राजकारणावर टीका करत आलो आहे. काँग्रेसकडून नेहमीच राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वाचे उल्लंघन केले गेले आहे, असे ते म्हणाले.
सब का साथ, सब का विकास हे माझ्या राजकारणाचे सूत्र
आपल्या देशात धर्माच्या आधारे कोणालाही आरक्षण मिळता कामा नये, असे जवाहरलाल नेहरू, डॉ. आंबेडकर यांनी ठरविले होते. मात्र, आता या तत्त्वाच्या विरोधात काँग्रेस वागत आहे. त्यांचे हे खरे रूप मी सर्वांसमोर आणणारच. घटना समितीत आमच्यापैकी कोणीही नव्हते, हे लक्षात घ्या, असे ते म्हणाले. तरीही निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तुमच्याकडून अल्पसंख्याकांना लक्ष्य केले गेले नाही का, असे विचारले असता, पंतप्रधान म्हणाले, भाजप कधीही अल्पसंख्याकांच्या विरोधात नव्हता. काँग्रेसने नेहमीच तुष्टीकरणाचे राजकारण केले, तर मी नेहमी संतुष्टीकरणाच्या मार्गावरून चालत आलो. सब का साथ, सब का विकास हे माझ्या राजकारणाचे सूत्र आहे व त्यात मी धर्माच्या आधारे भेदभाव करत नाही.
काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे मुस्लिम लीगच्या धोरणांची नक्कल
काँग्रेस खरोखर हिंदुंची मालमत्ता मुस्लिमांना देईल, असे तुम्हाला खरोखर वाटते का, की तो केवळ प्रचाराचा भाग होता, असा प्रश्नही पंतप्रधानांना विचारण्यात आला. हा केवळ माझ्या विचार करण्याचा विषय नाही आहे. कोणत्याही तार्किकतेशिवाय प्रचार करणे हे पाप आहे. या प्रकारचा अतार्किक प्रचार विरोधी पक्षांकडून केला जातो. ज्या दिवशी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला तेव्हाच, हा जाहीरनामा म्हणजे मुस्लिम लीगच्या धोरणांची नक्कल आहे, असे मी म्हटले होते. माझा हा आरोप चुकीचा असता तर काँग्रेसने तेव्हाच त्याचे खंडन केले असते. परंतु त्यांनी त्यावर मौन बाळगले. या प्रकरणी देशवासीयांना हळूहळू माहिती करून द्यायला हवी, असे मला वाटले, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
‘अधिक रोजगार दिले’
तरुणांना रोजगार देण्याच्या बाबतीत पूर्वीच्या सरकारांच्या तुलनेत आमच्या सरकारची कामगिरी सरस आहे, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला. ‘ईपीएफओ’तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार २०१७-१८ ते २०२२-२३ या कालावधीत नोकऱ्यांच्या संख्येत नऊपटीने वाढ झाली आहे. ही वाढ किरकोळ नाही, असे ते म्हणाले. केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये केवळ गेल्या वर्षभरात लाखो नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. व्यवसाय सुलभतेच्या सूचीत २०१४मध्ये देश १३४व्या क्रमांकावर होता, त्यात आता आपण ६३व्या स्थानी झेप घेतली आहे. २०१४मध्ये आपल्या देशातील एकूण मोबाइल फोनपैकी ७८ टक्के फोनची आयात होत असे. आता ९९ टक्क्यांहून अधिक फोन हे मेड इन इंडिया आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
‘काँग्रेसचे राजकारण पाकधार्जिणे’
पाकिस्तानच्या बाबतीत धोरण आखताना काँग्रेसने नेहमी राष्ट्रीय हितास बाधा आणली. निवडणुकीत राजकीय लाभ होण्यासाठी काँग्रेसचे नेते पाकिस्तानी नेत्यांचा पाठिंबा घेत आहेत, असा आरोपही पंतप्रधानांनी केला. पाकिस्तानचे नेते राहुल गांधी यांची स्तुती करत आहेत. या प्रकारामुळे आपल्याला निवडणुकीत लाभ होईल, असे काँग्रेसला वाटते. परंतु हा पक्ष वास्तवापासून किती दूर आहे हे यातून लक्षात येते, असे ते म्हणाले. भारतात काँग्रेस सत्तेत असणे हे आपल्यासाठी हिताचे आहे हे पाकिस्तानी नेत्यांना का वाटते, याचाही विचार व्हायला हवा, असे त्यांनी नमूद केले.
‘समान नागरी’चे संकेत
आमच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात ‘एक देश, एक निवडणूक’ आणि ‘समान नागरी कायदा’ या धोरणांची अंमलबजावणी होईल, असे संकेतही पंतप्रधानांनी दिले. पुन्हा सत्तेत आल्यानंतरच्या पहिल्या शंभर दिवसांत काय कामे करता येतील याचा आराखडा सादर करण्यास मी सर्व मंत्र्यांना सांगितले होते. परंतु मी त्यात आता २५ दिवसांची वाढ केली आहे. आमच्या सरकारने कोणत्या मुद्द्यांना, निर्णयांना प्राधान्य द्यावे यासाठी मी देशातील युवाशक्तिकडून सूचना मागवणार आहे, असे ते म्हणाले.