Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
‘हमास’च्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या नागरी वस्तीत गेल्या वर्षी सात ऑक्टोबरला केलेल्या हल्ल्यात बाराशे इस्रायली नागरिक ठार झाले होते, तर अडीचशे नागरिकांना ‘हमास’ने ओलिस ठेवले. या हल्ल्यास प्रत्युत्तर देऊन इस्रायलने पॅलेस्टाइनवर आक्रमण केले. इस्रायलने गाझा पट्टीवर केलेल्या संहारक हल्ल्यात आतापर्यंत सुमारे ३५ हजार पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आहेत. इस्रायलकडून होणाऱ्या या हल्ल्यांत गाझामधील सर्वसामान्य पॅलेस्टिनींची होरपळ होत असल्याने अमेरिकेसह युरोपीय देशांमध्ये नाराजी पसरली आहे.
इस्रायल व पॅलेस्टाइनमधील समस्या ही केवळ द्विपक्षीय चर्चेद्वारेच सुटू शकते, अशी अमेरिका व युरोपीय देशांची धारणा असल्याने पॅलेस्टाइनला स्वतंत्र देश म्हणून लवकरच मान्यता देण्यात येईल, असे सूतोवाच काही युरोपीय देशांनी गेल्या आठवड्यात केले होते. त्यानुसार बुधवारी नॉर्वेने सर्वप्रथम हा निर्णय घोषित केला. नॉर्वेचे पंतप्रधान जोनास स्टोर यांनी ही माहिती दिली. ‘पॅलेस्टाइनला मान्यता दिल्याशिवाय मध्य पूर्वेत शांतता नांदणार नाही. आम्ही केवळ पॅलेस्टाइनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिलेली नाही, तर इस्रायल व पॅलेस्टाइनबाबत अरब देशांनी सुचवलेल्या शांतता करारालादेखील मान्यता दिली आहे,’ असे ते म्हणाले.
नॉर्वेपाठोपाठ आयर्लंड व स्पेननेही ही घोषणा केली. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सँचेझ यांनी स्पेनच्या संसदेत हा निर्णय जाहीर केला. समाजवादी विचारसरणीचे सँचेझ यांनी पॅलेस्टाइनला मान्यता मिळावी, यासाठी अनेक युरोपीय व मध्य पूर्वेतील देशांचे दौरे केले आहेत. या निर्णयामुळे आपण भूतकाळ; तसेच मृत्युमुखी पडलेल्या पॅलेस्टिनींना परत आणू शकत नाही. मात्र, या मान्यतेमुळे पॅलेस्टिनींना त्यांचे वर्तमान व भविष्य मिळेल, असे ते म्हणाले. पॅलेस्टाइनला मान्यता म्हणजे इस्रायलविरोध असे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजदूतांना मायदेशी परतण्याचे निर्देश
कोपनहेगन (डेन्मार्क) : इस्रायलचे परराष्ट्रमंत्री इस्रायल कॅट्झ यांनी आयर्लंड, स्पेन व नॉर्वेतील आपल्या राजदूतांना तातडीने मायदेशी परतण्याचे निर्देश दिले. ‘दहशतवादी कारवायांचा असाही लाभ होऊ शकतो, असा संदेश पॅलेस्टाइनला मान्यता देणारे देश देऊ इच्छितात,’ अशी टीका कॅट्झ यांनी केली. ‘हमास’ने ओलिस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांच्या सुटकेचा मार्ग या देशांनी दिलेल्या मान्यतेमुळे खडतर झाला आहे. तसेच, इस्रायल व हमासमधील संभाव्य युद्धबंदीवरही याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असे ते म्हणाले.