Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- प्रियांका गांधी यांना अटक
- लखीमपूर घटनेवरुन शिवसेनाचा संताप
- प्रियांका गांधींच्या समर्थनार्थ शिवसेनेची भाजपवर टीका
शेतकरी आंदोलनामुळे तापलेल्या लखीमपूर खेरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने देशातील केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसंच, महाराष्ट्र भाजपवरही अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.
‘लखीमपूर खेरीत केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांचे हत्याकांड घडवले. त्या मंत्रीपुत्रास वाचवण्याचे प्रयत्न योगींच्या पोलिसांनी केले. तो मी नव्हेच, मी तेथे नव्हतोच, असा आव मंत्रीपुत्राने आणला. पण आता शेतकऱ्यांवर घुसवलेल्या गाडीचा व्हिडिओच समोर आला. त्यामुळं सरकार काय करणार?, असा सवाल करतानाच. हे प्रकरण पश्चिम बंगला, महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ, केरळात घडले असते तर त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने देशभर आंदोलन पुकारले असते,’ अशी जळजळीत टीका शिवसेनेनं केली आहे.
वाचाः राहुल गांधींना लखीमपूरला जाण्यास योगी सरकारने परवानगी नाकारली
‘लखीमपूर खेरीत जाण्यापासून छत्तीसगढ, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनाही योगी सरकारने रोखले आहे. हे काय हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध सुरु आहे काय? आपल्याच देशातील दोन मुख्यमंत्र्यांना लखनौत उतरण्यापासून रोखले जाते. हा संघराज्यातील एक विचित्र प्रकार घडला आहे. लोकशाहीचा असा गळा आणीबाणीच्या काळातही कधी घोटला नव्हता. आज जे घडले आहे ते भयंकर आहे,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
‘शेतकऱ्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अमूल्य योगदान दिले. सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली ‘बार्डोलीचा सत्याग्रह’ का केला, हे शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. गांधीजींनी मिठापासून परदेशी कपड्यांपर्यंत केलेली आंदोलने शेतकऱ्यांच्याच बलिदानाने यशस्वी झाली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी शेतकऱ्यांचीच पोरे शहीद झाली व आज देशाच्या सीमेवरही शेतकऱ्यांचीच पोरे मरत आहेत. त्या जवानांच्या कुटुंबांवर भरधाव गाड्या घालून मारण्याचे पाप सरकार करीत असेल तर ‘देश खतरे में है!’ असे मानावेच लागेल,’ अशी टीका शिवसेनेने केली आहे.
वाचाः इंग्रजांना घालवले तसे भाजप सरकारलाही घालवायचे आहे: नाना पटोले
अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे
- शेतकऱ्यांना काय हवे? तीन कृषी कायद्यांवर फेरविचार व्हावा असे त्यांना वाटते, पण सरकार ऐकायला तयार नाही. केंद्र सरकारला शेतीचे खासगीकरण करुन मर्जीतल्या उद्योगपतींना देशातील शेतजमीन द्यायची आहे. सर्व सरकारी संपत्ती खासगी लोकांना विकून टाकल्यावर आता शेतजमिनींचा लिलाव सुरू झाला आहे. त्या मनमानीविरोधात शेतकरी उभा ठाकला आहे. पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांचे ऐकायला हवे. कायदे हे जनतेसाठी केले जातात. जनता कायद्यासाठी जन्माला येत नाही. कायदे मोडून, कायदेभंग करूनच गांधीजींनी स्वातंत्र्याचे आंदोलन पेटविले हे विसरू नका.
- प्रियंका गांधी यांची लढाई शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठीच सुरू आहे. त्यांना अटक करून त्यांचा आवाज आणि शेतकऱ्यांचा आक्रोश दडपून टाकता येईल, असे सरकारला वाटत असेल तर तो भ्रम आहे. नव्या ईस्ट इंडिया कंपनीकडे देश सोपवला जाऊ नये यासाठी लढा देणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या सरकारचा धिक्कार असो!
- शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. आता तरी दोन अश्रू ढाळा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. हा स्वातंत्र्याचा रक्त महोत्सव म्हणायचा का? हे काय सुरू आहे आपल्या देशात.