Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
बिहार ही अशी भूमी आहे की जिने सामाजिक न्यायाच्या लढ्यासाठी नवी दिशा दिली. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व ओबीसींच्या वाट्याचे आरक्षण मुस्लिमांना देण्याचा विरोधकांचा डाव मी हाणून पाडेन, असे मी आज येथे सांगू इच्छितो, असे ते म्हणाले. मुस्लिमांची मतपेढी राखण्यासाठी विरोधक कोणत्याही थराला जाऊ शकतात. ते मुस्लिमांसमोर मुजराही करतील, प्रसंगी त्यांची गुलामीही करतील, अशी घणाघाती टीका पंतप्रधानांनी केली.
मुस्लिम आरक्षणप्रश्नी पंतप्रधानांनी विरोधकांवर गंभीर आरोप केला. केंद्रात विरोधकांची सत्ता आल्यास मुस्लिमांना ठोस आरक्षण देण्यासाठी ते सर्वप्रथम घटनादुरुस्ती करतील व तो निर्णय न्यायालयही बदलू शकणार नाही याची काळजी घेतली. हे सर्व त्यांनी आधीच ठरवले आहे, असा आरोप पंतप्रधानांनी केला. आमचा असा कोणताही विचार नाही असे विरोधकांनी लेखी द्यावे व माझ्या या विधानाचे खंडन करावे, असे आव्हान मी त्यांना दिले. परंतु त्यांच्या मनात अपराधाची भावना असल्याने ते हे आव्हान स्वीकारत नाहीत, असे ते म्हणाले.
या सभेत त्यांनी भूमिपुत्रांच्या भावनेलाही हात घातला. बिहारमधील अनेक जण परराज्यांत जाऊन सेवा देतात. परंतु पंजाब व तेलंगणमधील काँग्रेस नेत्यांनी तसेच, तमिळनाडूतील द्रमुक नेत्यांनी, बंगालमधील तृणमूलच्या नेत्यांनी बिहारच्या नागरिकांचा अपमान केला आहे, तसेच त्यांच्या भावना दुखावल्या आहेत, असा आरोप पंतप्रधानांनी केला. कंदिलासह (राष्ट्रीय जनता दलाचे चिन्ह) मुजरा करणारे राष्ट्रीय जनता दलाचे नेत्यांमध्ये बिहारींचा असा अपमान होत असताना आपल्या सहकारी पक्षनेत्यांविरोधात अवाक्षर काढण्याचे धैर्य नाही, असेही ते म्हणाले.
‘खर्गेंवर खापर फुटेल’
या निवडणुकीत विरोधकांच्या आघाडीचा दारुण पराभव होणार आहे. त्यावेळी राजद व काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांचे कपडे फाडताना दिसतील. दुसरीकडे, पराभवाचे खापर मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर फोडून काँग्रेसचा शाही परिवार विदेशात फिरायला जाईल, असा दावाही पंतप्रधानांनी केला.
प्रियांका गांधींचा पलटवार
बिहारमधील सभेत मोदी यांनी जी भाषा वापरली ती इतिहासात कोणत्याही पंतप्रधानांनी वापरली नसेल. आपला देश व आम्हीही पंतप्रधानपदाचा आदर करतो. मात्र मोदी यांना त्या पदाची प्रतिष्ठा जपता आली नाही. ते ज्याप्रकारे बोलत आहेत, त्यावरून त्यांचे खरे रूप उघड होत आहे, अशा शब्दांत काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांनी पंतप्रधानांना प्रत्युत्तर दिले.
राजदची टीका
देशाचे पंतप्रधान या भाषेत कसे बोलू शकतात, सभ्यपणे होणाऱ्या चर्चेचे सारे मानदंड त्यांनी झुगारून दिले आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज कुमार झा यांनी दिली.