Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
जानेवारी-एप्रिलपर्यंतच्या तीन महिन्यांत दिल्लीत सुमारे नऊ लाख नवीन मतदारांची भर पडली. केवळ ४० ते ४४ वयोगटातील सुमारे १७ लाख ४५ हजार मतदारही दिल्लीत आहेत. दिल्लीत एकूण संख्येच्या निम्म्याहून जास्त म्हणजे सुमारे ५६-५७ टक्के मतदार १८ ते ४४ वयोगटातील आहेत. म्हणजे दिल्लीच्या उमेदवारांच्या भवितव्याची चावी महिलांच्या बरोबरीने तरुणांच्या हाती असल्याचे स्पष्ट आहे.
रोजगार क्षेत्रातील अध्ययनाबाबत अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या सीएमआय संस्थेच्या अहवालानुसार , करोनाच्या नंतर देशातील बेरोजगारीत सातत्याने वाढ होत असून केवळ करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर देशात रोजगार गेलेल्यांची संख्या सुमारे दोन कोटींच्या आसपास आहे. त्यातही शहरी भागातील बेरोजगारीच्या प्रमाणात मोठी वाढ होत आहे. साहजिकच शहरी तरुणांसमोर रोजगार हा मोठा प्रश्न असल्याचे ओळखून काँग्रेस, आम आदमी पक्ष (आप) व भाजप या रिंगणातील सर्व प्रमुख पक्षांनी शिक्षण, रोजगार आणि स्टार्टअपशी संबंधित गॅरेंटी दिल्या आहेत.
तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी तीनही पक्षांनी लोकप्रिय आश्वासने दिली आहेत. भाजप व आपचे खास दिल्लीसाठी वेगळे जाहीरनामे आहेत. त्यातही रोजगार, स्वयंरोजगार हे ठळक मुद्दे आहेत. दिल्लीतील किमान २ लाख ८० हजार तरुणांनी या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान केले. सन २०१९च्या निवडणुकीत दिल्लीकर तरुण मतदारांची संख्या ९७,६८४ होती.
सन २०१४च्या निवडणुकीत लोकपाल आंदोलन व इतर कारणांमुळे भाजपला मत देण्यासाठी तरुण मतदारांनी दिल्लीत बूथवर मोठी गर्दी केली होती. यंदा मतदार यादीत नाव नोंदविण्याबाबत सुरुवातीला तरुणांमध्ये उत्साह दिसला नाही. बिहार, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात १८ वर्षे पूर्ण झालेल्या सुमारे २५ टक्क्यांपेक्षा कमी तरुणांनी मतदार म्हणून नोंदणी केली होती. याबाबत महाराष्ट्रातील (२२ टक्के) परिस्थितीही फारशी चांगली नव्हती.
मात्र दिल्लीत नंतर आप व भाजपने मतदार नोंदणीची मोहीम वेगवान केली व चित्र पालटत गेले. प्रगती मैदानावरील नवमतदार संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर काही मिनिटे सतत टाळ्यांचा गजर सुरू होता. तरुणांनी मतदान केंद्रांवर येऊन मतदान करावे, यासाठी दिल्लीतही ‘रन फॉर डेमोक्रसी’सारखे उपक्रम राबविण्यात आले होते. परिणामी शनिवारच्या मतदानात तरुणांचा उत्साह जाणवण्याइतपत होता.