Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘रेमल’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली; वादळापूर्वी रेल्वे, रस्ते वाहतुकीला फटका; विमानतळावरील उड्डाणे रद्द

8

वृत्तसंस्था, कोलकाताबंगालच्या उपसागरातील ‘रेमल’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून रविवारी मध्यरात्री ते पश्चिम बंगालसह बांगलादेशला तडाखा देण्याची शक्यता आहे. यावेळी ताशी ११० ते १२० किमी वेगाने वारे वाहतील, वाऱ्यांचा वेग ताशी १३५ किमीपर्यंतही जाऊ शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. वादळाच्या परिणामी पश्चिम बंगालच्या किनारी भागात अनेक ठिकाणी रविवार सकाळपासूनच वारे आणि पाऊस सुरू झाला. त्यामुळे रस्ते, रेल्वे, विमान वाहतुकीला फटका बसला.

कोलकाता आणि अन्य जिल्ह्यांच्या ठिकाणी पाऊस व वाऱ्यांमुळे रविवारी रस्त्यावर बस, टॅक्सी, तिचाकी आदी वाहनांची रहदारी कमी होती. पूर्व आणि दक्षिण पूर्व रेल्वेने काही रेल्वेगाड्या रद्द केल्या. दुसरीकडे खबरदारीचा उपाय म्हणून कोलकाता विमानतळावरील सर्व उड्डाणे रविवारी दुपारपासून ते २६ मे रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत अशा २१ तासांसाठी स्थगित ठेवण्यात आली. या कालावधीत आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत मार्गांवरील ३९४ विमानांचे प्रस्थान व आगमन रद्द राहील, असे भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) स्पष्ट केले आहे.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वेने रविवारी आणि सोमवारी काही रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. पूर्व रेल्वेने सियाल्दा विभागातील सियाल्दा दक्षिण आणि बारासात-हसनाबाद विभागातील रेल्वे गाड्या रविवारी रात्री ११ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत रद्द केल्या आहेत. तर दक्षिण पूर्व रेल्वेने रविवारी कंदरी एक्स्प्रेससह दिघा या पर्यटन स्थळावरील स्थानकातील काही मेमू आणि ईएमयू गाड्या रविवार आणि सोमवार हे दोन दिवस रद्द केल्या आहेत.

चक्रीवादळामुळे जीवितहानी होऊ नये, यासाठी तटरक्षक दलाच्या ईशान्य विभागाच्या कोलकाता येथील मुख्यालयाने खबरदारीचे सर्व उपाय अंमलात आणले आहेत. हल्दिया आणि पारादीप येथील दूरस्थ केंद्रांद्वारे मच्छिमार आणि व्यापारी जहाजांना सूचना दिल्या जात आहेत. पश्चिम बंगालमधील हल्दिया आणि फ्रासरगंज तसेच ओडिशातील पारादीप आणि गोपालपूर येथे नऊ आपत्कालीन मदत पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत, असेही तटरक्षक दलाने म्हटले आहे. मच्छिमारांनी सोमवार सकाळपर्यंत मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असे आवाहनही हवामान खात्याने केले आहे.

पश्चिम बंगालमधील विविध यंत्रणांचा समन्वय साधण्यासाठी लालबाजार येथील कोलकाता पोलिस मुख्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. शहरातील १० पोलिस विभागांमध्ये १० पोलिस पथके पाठवण्यात आली आहेत. कोलकाता महापालिका, एसडीआरएफ, एनडीआरएफ यांच्यासोबतही समन्वय साधला जात आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. कोलकाता, उत्तर आणि दक्षिण २४ परगणा, पूर्व आणि पश्चिम मेदिनीपूर, हावडा आणि हुगळी यासह विविध जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफची पथके सज्ज आहेत.

जमिनीच्या दिशेने सरकत असलेल्या वादळामुळे दक्षिण २४ परगणा जिल्ह्यासह किनारी भागात काही ठिकाणी रविवारी संध्याकाळपासूनच पावसाचा मारा सुरू झाला.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.