Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- अरबाज मर्चंटचा सीसीटीव्ही फुटेजसाठी अर्ज.
- एस्प्लनेड कोर्टाने एनसीबीला बजावली नोटीस.
- एनसीबीने खोटे आरोप लावल्याचे अरबाजचे म्हणणे.
वाचा: ड्रग्ज पार्टी: मंत्री नवाब मलिक यांचा ‘तो’ आरोप एनसीबीने फेटाळला
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने शनिवारी कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल येथून क्रूझ गोव्यासाठी रवाना झाल्यानंतर काही वेळातच ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह अरबाज मर्चंट व अन्य सहा जणांना प्रथम ताब्यात घेण्यात आले व नंतर अटकेची कारवाई करण्यात आली. हे सर्वजण सध्या एनसीबी कोठडीत असून बुधवारी अरबाज मर्चंट याने वकिलांकरवी जामिनासाठी अर्ज केला. त्यासोबतच मर्चंट याने स्वतंत्र अर्ज करत कारवाईचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध व्हावे अशी विनंती केली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट, ग्रीन गेट, आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल येथील २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० ते रात्री ८.३० पर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देण्याचे निर्देश द्यावेत आणि या संपूर्ण फुटेजचे रेकॉर्ड संरक्षित करून ठेवण्याची सूचना सीआयएसएफला देण्यात यावी, अशी विनंती मर्चंटच्या अर्जात करण्यात आली. याबाबत अॅड. तारक सय्यद यांचे म्हणणे ऐकून घेत मुख्य महानगर दंडाधिकारी आर. एम. नेर्लिकर यांनी सीसीटीव्ही फुटेजची मागणी करणाऱ्या अर्जावर एनसीबीला नोटीस बजावली.
वाचा:‘क्रूझवरील एनसीबीच्या छाप्यात खासगी लोक कसे’?; काँग्रेसला वेगळीच शंका
‘पंचनाम्यात ज्या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत त्याची सत्यता पडताळण्यासाठी अशा फुटेजची मागणी करता येऊ शकते’, असे नमूद करतानाच या संपूर्ण कारवाईत कोणता प्रतिबंधित पदार्थ जप्त करण्यात आला होता किंवा नाही, हे या फुटेजमधून स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले. या नोटीसबाबत एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडे विचारणा केली असता, आम्ही आमचे उत्तर कोर्टात सादर करू, असे त्यांनी सांगितले. एनसीबीला गुरुवारी आपले म्हणणे कोर्टात मांडावे लागणार आहे. मुख्य म्हणजे अरबाज मर्चंट याच्याकडे ६ ग्रॅम चरस सापडल्याचा दावा एनसीबीने केला होता मात्र अरबाजने हा आरोप फेटाळला आहे. माझ्याकडून कोणताच अमली पदार्थ जप्त करण्यात आलेला नाही. माझ्या शूजमध्येही काही सापडले नाही. माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत, असा अरबाजचा दावा आहे.
दरम्यान, एनसीबीने क्रूझवर केलेली कारवाईवर मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या कारवाईत एनसीबी अधिकाऱ्यासोबत खासगी व्यक्ती काय करत होत्या, असा गंभीर प्रश्नही मलिक यांनी विचारला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.
वाचा: लखीमपूर घटनेवर महाविकास आघाडी आक्रमक; ‘या’ तारखेला महाराष्ट्र बंद