Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
‘मोदी जी, यावेळी कॅमेरा बरोबर न घेता ध्यानाला जा’ असा टोला राष्ट्रीय जनता दलाने लगावला. काँग्रेसने याची संभावना ‘नाटकबाजी’ अशी केली आहे. तृणमूल काँग्रेसनेही याचे प्रक्षेपण झाल्यास निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याचे ठरवले आहे.
राजदचे खासदार मनोज झा म्हणाले की, निवडणूक प्रचारात मोदी यांनी इतक्या शिव्या दिल्या आहेत की आता त्यांना खरोखरच ध्यान करण्याची गरज आहे. मोदी यांच्या प्रस्तावित धानधारणेच्या विरोधात तामिळनाडू काँग्रेस निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. तामिळनाडू काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष के सेल्वापेरुन्थगाई यांनी आचारसंहिता लागू असताना होणाऱ्या या ध्यान सोहळ्याला कडाडून विरोध केला आहे. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यापूर्वी आयोजित केलेले हे ‘नाटक’ असल्याचे सांगून सेल्वापेरुन्थगाई म्हणाले की, ध्यानाचा हा इव्हेंट आचारसंहितेचे सरळसरळ उल्लंघन आहे. कारण या ध्यानाच्या सतत होणाऱ्या प्रसारमाध्यमांतील सततच्या वार्तांकनामुळे ते (सातव्या टप्प्यातील) मतदारांना प्रभावित करू शकते.
पंतप्रधान मोदी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथील प्रसिद्ध विवेकानंद रॉक मेमोरियलमधील ध्यान मंडपम मध्ये ३० मे पासून सुमारे ४५ तासांसाठी जी ध्यानधारणा करणार आहेत त्या पार्श्वभूमीवर या परिसरात अफाट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मात्र पंतप्रधानांबरोबर कोणते कॅमेरा पथक जाणार याची माहिती उपलब्ध झालेली नाही. तमिळनाडू पोलिस, त्यांचे विशेष पथक, लष्कर व नौदल, निमलष्करी दल यांचे हजारो जवान या परिसरात खडा पहारा देतील.
तिरुनेलवेल्ली चे पोलिस महानिरीक्षक प्रवेश कुमार आणि पोलीस अधीक्षक ई. सुंदरावथनम यांनी रॉक मेमोरियल, बोट जेटी, हेलिपॅड आणि स्टेट गेस्ट हाऊस या भागातील सुरक्षा व्यवस्थेची बुधवारी पाहणी केली. पंतप्रधान ध्यानमग्न असताना पंतप्रधानांचे विशेष सुरक्षा कमांडो व नौदलाच्या सशस्त्र गस्ती युद्धनौकाही डोळ्यात तेल घालून या परिसरात तैनात राहतील. केवळ तमिळनाडूचेच किमान २००० पोलिस पंतप्रधान आल्यापासून शुक्रवारनंतर (१ जून) त्यांचे प्रस्थान होईपर्यंत कन्याकुमारी परिसराच्या कानाकोपऱ्यात पहारा देतील. या काळात विवेकानंद स्मारक व तिरूवल्लुवर स्मारकाचा परिसर पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहेत. नौदल सागरी सीमांवर लक्ष ठेवणार आहे.