Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Mani Shankar Aiyar: चीनचे ‘कथित’ आक्रमण, मणिशंकर यांच्या विधानाने पुन्हा वाद; म्हणतात…

5

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा नव्या वादाला तोंड फोडले आहे. भारत-चीन १९६२च्या युद्धाचा उल्लेख करताना अय्यर यांनी चीनचे ‘कथित’ आक्रमण, असा शब्दप्रयोग केला. त्यामुळे काँग्रेसची पुन्हा कोंडी झाली. भाजपने काँग्रेसवर टीकेची झोड उठवली, तर काँग्रेसने अय्यर यांच्या विधानापासून हात झटकले.‘नेहरूज फर्स्ट रिक्रूट’ या कल्लोल भट्टाचार्य यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलताना मंगळवारी मणिशंकर अय्यर यांनी भारत-चीन युद्ध, परराष्ट्र सेवेबद्दल भाष्य केले. १९६२च्या भारत-चीन युद्धाबाबत बोलताना अय्यर यांनी चीनचे ‘कथित’ आक्रमण, असा उल्लेख केला. त्यानंतर काही क्षणांतच त्यांनी ‘कथित’ शब्दप्रयोगाबद्दल माफी मागितली.
Pune Porsche Case : डॉ. तावरेची नियुक्ती हसन मुश्रीफांच्या शिफारसीने, ससूनच्या डीनकडून राजकीय हस्तक्षेप मान्य

अय्यर यांच्या या विधानांपासून काँग्रेसने हात झटकले. ‘२० ऑक्टोबर १९६२ला सुरू झालेले चीनचे आक्रमण खरे होते, असे स्पष्ट करतानाच काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी चीनने मे २०२० मध्ये लडाखमध्ये केलेल्या आक्रमणामुळे आपल्या २० जवानांना प्राण गमवावे लागले’, याकडेही लक्ष वेधले. ‘मणिशंकर अय्यर यांनी ‘कथित’ आक्रमण असा उल्लेख चुकून केला. त्याबद्दल त्यांनी माफीही मागितली आहे,’ असे जयराम रमेश म्हणाले.

दुसरीकडे, भारतीय परराष्ट्र सेवा हे आधी ‘उच्चवर्णीयांचे’ क्षेत्र होते. मात्र, आता या सेवेचे लोकशाहीकरण झाले आहे,’ असे विधान अय्यर यांनी याच कार्यक्रमात केले. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळातील परराष्ट्र सेवेत भरती झालेला मी शेवटचा व्यक्ती आहे, असे सांगून अय्यर यांनी परराष्ट्र सेवेतील पहिल्या पिढीतील भरती इंग्रजीवर प्रभुत्व असलेल्यांपुरती सीमित होती, असे विधान केले. परराष्ट्र सेवा भरती प्रक्रियेतील दोष आता दूर झाले असून, इंग्रजीबरोबरच हिंदी भाषकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या सेवेत आता महिलांची संख्याही लक्षणीय आहे, असे अय्यर म्हणाले. आपल्या देशाच्या बहुविविधतेचे प्रतिबिंब परराष्ट्र सेवा क्षेत्रात पडू लागले, ही चांगली गोष्ट आहे, असे अय्यर यांनी स्पष्ट केले.

‘काँग्रेसची भारतविरोधी मानसिकता उघड’

मणिशंकर अय्यर यांच्या चीनबद्दलच्या विधानातून काँग्रेसची भारतविरोधी मानसिकता उघड झाली आहे, अशी टीका भाजपने केली. राहुल गांधी यांच्या संमतीशिवाय अय्यर हे असे विधान करू शकत नाहीत, असा दावा करताना भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी या प्रकरणावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मौनाबद्दल टीका केली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.