Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

West Bengal Election Result: बंगालमध्ये तृणमूलची ‘दीदी’गिरी; का खालावली भाजपची कामगिरी? ३५ जागांवरचा दावा सपशेल फेल

14

वृत्तसंस्था, कोलकाता : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नागरिकत्व सुधारणा कायद्याची (सीएए) अंमलबजावणी आणि संदेशखाली मुद्यावरून भाजपची आक्रमकता यास प्रत्युत्तर देत तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले. तीन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत अधिक मताधिक्य मिळवित भाजपला राज्यात रोखले.

राज्यात भाजप ४२ पैकी ३५ जागा जिंकणार असल्याचा दावा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. मात्र, तो सपशेल फोल ठरल्याचे निवडणूक निकालातून स्पष्ट झाले. भाजपला सायंकाळी उशिरापर्यंत केवळ १२ जागांवर मताधिक्य राखता आले. बांगलादेश सीमेवर असलेल्या आसामपाठोपाठ पश्चिम बंगालमध्येही ‘सीएए’ची अंमलबजावणी करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. त्यास ममता बॅनर्जी यांनी विरोध केला होता. भाजपशी सामना करण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी बंगाली अस्मितेसह राज्यातील जनतेसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांच्या अंमबजावणीचा मुद्दा मांडला. याशिवाय गावकुसावरील लोकांच्या रोजगारासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या मनरेगा योजनेलाही ममतादीदींनी प्रचाराचा मुख्य मुद्दा बनविला. या योजनेसाठीचे कोट्यवधी रुपये केंद्र सरकारने रोखल्याचा त्यांनी आरोप केला. त्यास प्रत्युत्तर देणे भाजप नेत्यांना कठीण झाले. भाजपच्या सहा जागा कमी झाल्याच, सोबत मतांमध्ये सुमारे चार टक्क्यांचीही घट झाली.

पहिले राम; फिर वाम

‘माकप’प्रणित डाव्या आघाडीने ‘पहिले रामे; फिर वाम’ असे धोरण आखले होते. त्यानुसार २०१९ च्या लोकसभेसह २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला फायदा झाला होता. डाव्या आघाडीची मते थेट भाजपकडे वळती झाली होती. मात्र, यंदा तसे होऊ शकले नाही. काँग्रेस-डाव्या पक्षांच्या आघाडीला राज्यात फारसे यश मिळाले नाही. मात्र, ही आघाडी भाजपच्या पराभवासाठी जबाबदार ठरली. यामुळे ‘तृणमूल’च्या विजयाचा मार्ग सुकर झाला. अनेक जागांवर भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या मतांमधील फरकाइतके किंवा त्यापेक्षा अधिक मते काँग्रेस-डाव्या आघाडीने पटकावली. त्यामुळे भाजपचे मोठे नुकसान झाले.
Lok Sabha Result 2024 : मोदी-अमित शहा जोडीला पहिला झटका, अब की बार 400 पारचं घोडं कुठं अडलं ?
‘संदेशखाली’ प्रभावशुन्य

बशीरहाट मतदारसंघांतर्गत येणाऱ्या संदेशखाली येथील महिलांच्या कथित लैंगिक अत्याचाराचा मुद्दा भाजपने मांडला होता. या प्रकरणात ‘तृणमूल’च्या नेत्यांचा सहभाग असल्याचा आरोप भाजपने केला होता. तसेच यावरून हिंदू-मुस्लिम वादही रंगविण्यात आला होता. परंतु, ममतादीदींनी या मुद्यावरून भाजप राज्याची बदनामी करीत असल्याचे लोकांमध्ये ठसविले. त्याचा फटका भाजपला बसला.

महिला, मुस्लिमांचे पाठबळ

ममता यांनी महिला आणि मुस्लिम यांची मते आपल्याकडे राहतील याची पूर्ण काळजी घेतली. त्यामुळेच महिलांसाठीच्या विविध योजनांच्या लाभाची माहिती त्या प्रत्येक सभांमधून येत होत्या. मुस्लिमांच्या माध्यमातून राज्याच्या बदनामीचा प्रयत्न भाजप करीत असल्याचेही त्यांनी ठसविले. सोबत ममता यांनी ‘सॉफ्ट हिंदुत्वा’चाही आधार घेतला. यंदा राज्यात रामनवमीला पहिल्यांदाच राज्य सरकारने सुटी जाहीर केली होती.

एकूण जागा = ४२
तृणमूल = २९
भाजप = १२
काँग्रेस १

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.