Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Congress, BJP on Stock Market: शेअर बाजार घसरताच राजकीय वातावरण तापले, काँग्रेसच्या आरोपावर भाजपचा पलटवार
राहुल गांधींनी दावा केलै की, पंतप्रधान, गृहमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी मतदानाच्या निकालापूर्वी लोकांना ‘गुंतवणुकीचा सल्ला’ दिला होता. यात सहभागी असलेल्या ‘बनावट’ पोलस्टर्सची चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच त्यांनी ३० लाख कोटी वापरुन ‘बनावट’ एक्झिट पोल रचण्यात आल्याचे देखील नमूद केले. दरम्यान भाजपचे नेते पीयूष गोयल यांनी राहुल गांधींवर गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्याचा कट असल्याचा पलटवार केला आहे.
राहुल गांधी यांचा देशी आणि विदेशी गुंतवणूकदारांना घाबरवण्याचा प्रयत्न आहे असा आरोप भाजपने केला आहे. ‘मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेच्या तयारीत असल्याने शेअर बाजार वाढत आहेत.’ असे उत्तर मुंबईचे नवनिर्वाचित खासदार पीयुष गोयल म्हणाले आहेत. तर ‘राहुल गांधींनी अजूनही स्वपक्षाचे लोकसभा निवडणुकीतील नुकसान भरून काढलेले नाही, आता ते बाजारातील गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्याचा कट रचत आहेत.’ असे म्हणत संसदीय समितीच्या चौकशीची मागणी देखील फेटाळून लावली आहे.
अर्थ मंत्रालयाने माजी सचिव ईएएस सरमा यांनी या मागणीची दखल घेत आर्थिक व्यवहार सचिव अजय सेठ यांना पत्र लिहिले आहे. अंमलबजावणी संचालनालय, सीबीआय आणि सीबीडीटीकडून शेअर बाजारातील या घसरणीची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. सेबीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे का, असा सवालही सरमा यांनी यावेळी केला.
एनडीएच्या निर्णायक विजयाच्या एक्झिट पोलच्या भाकीतांमुळे, BSE सेन्सेक्सने आठवड्याची सुरुवात २५००च्या वाढीव अंकांनी ७६,४६९ च्या विक्रमी उच्चांकावर नेली. तथापि, मंगळवारी मतदानाच्या निकालानंतर ४३९० गुणांची मोठी घसरण पाहायला मिळाली. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या ३१ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीचा चुराडा झाला. एका क्षणी मोठ्या प्रमाणात शेअर विक्रीमुळे सेन्सेक्स ६००० अंकांनी खाली आला होता. त्यानंतर आता तो सावरला आहे, गुरुवारी ६९२ अंकांनी वाढून ७५,०७४ वर बंद झाला आहे.
मतदानाच्या निकालापूर्वी भाजप नेत्यांनी ५ कोटी कुटुंबांना शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास का प्रोत्साहन दिले? तसेच “दोन्ही मुलाखती एकाच माध्यम समूहाला का दिल्या, ज्यांची सध्या शेअर बाजारात फेरफार केल्याप्रकरणी सेबीची चौकशी सुरू आहे? भाजप, बनावट एक्झिट पोलर्स आणि संशयास्पद विदेशी गुंतवणूकदार यांच्यात काय संबंध आहे? ज्यांनी एक्झिट पोल जाहीर होण्याच्या एक दिवस आधी गुंतवणूक केली आणि पाच कोटी कुटुंबांमार्फत मोठा नफा कमावला. अशा प्रश्नांचा भडीमार करत राहुल गांधींनी भाजपाच्या धुरीणांना घेरले.
‘राहुल गांधींनी नमूद केलेला ३० लाख कोटी रुपयांचा आकडा काल्पनिक आणि वास्तविक व्यापार व्यवहाराशी त्याचा काहीही संबंध नसल्याचे नमूद केले. तर गेल्या दहा वर्षांत शेअर बाजाराच्या वाढीचा सर्वाधिक फायदा किरकोळ आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांना झाला आहे,’ असे देखील पीयुष गोयल यांनी स्पष्ट केले आहे.
गोयल यांनी राहुल गांधींवर टीका करत म्हणाले, ‘राहुलला गुंतवणूकदारांच्या भीतीबद्दल काळजी वाटली पाहिजे कारण काँग्रेस अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत असताना बाजार कोसळला होता. आता लोकांना विश्वास आहे की मोदी सरकार परत येत आहे आणि बाजार स्थिर झाला आहे तसेच बाजाराच्या मागील उच्चांकांवर पुन्हा स्थिरावणार आहे.’ तसेच ‘नवीन सरकारचा सुधारणेचा अजेंडा देशाच्या भवितव्यासाठी निर्णायक काळात सुरू राहील, असा विश्वासही गोयल यांनी व्यक्त केला आहे.