Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Parliament Statue Removal :संसद भवन परिसरातील महापुरुषांचे पुतळे हटवण्याबाबत कोणत्याही पक्षांशी चर्चा नाही, जयराम रमेश यांचा भाजपवर आरोप
गुरुवारी जयराम रमेश यांनी आपल्या अधिकृत X अकाउंटवरुन यासंबंधी माहिती देत भाजपवर हल्लाबोल केला होता. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले होते की, “संसद परिसरात महत्वाच्या ठिकाणी असलेले महात्मा गांधी,डॉ.आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे हटवले गेले आहेत.हे अत्याचारी आहे.” यासंबंधीचे घटनास्थळावरील फोटो देखील त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये जोडले होते.
पुतळे का हटवण्यात आले ?
लोकसभा सचिवालयाकडून तातडीने एक निवेदन स्वरुप खुलासा प्रसिद्ध करण्यात आला असून त्यामध्ये संसद सचिवांनी सांगितले आहे की, “पुतळे आदरपूर्वक संसद भवन संकुलातील भव्य प्रेरणा स्थळ मध्ये स्थापित करण्यासाठी हलविण्यात आले आहेत. या प्रेरणा स्थळासाठी सर्व पुतळ्यांची आदरपुर्वक प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. संसद संकुलाला भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना या पुतळ्यांचे सहज दर्शन व्हावे अशा पद्धतीने हे प्रेरणास्थळ विकसित केले जात आहे.”
या निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की, संसद संकुलात,संसदेच्या विविध भागात देशातील महान नेते आणि स्वातंत्र्यसैनिकांचे पुतळे बसविण्यात आले होते. या महान विरांनी आपल्या जीवनातून,तत्वज्ञानाने देशाचा अभिमान प्रस्थापित केला आणि शोषित,वंचित,आदिवासी समाजाच्या उत्थानाचा मार्ग मोकळा केला. ते सद्याच्या आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणेचे स्त्रोत आहेत.
संसद सचिवांनी नमुद केले की,संसद संकुल हे लोकसभा अध्याक्षांच्या अखत्यारीत येते. याआधी देखील पुतळे माननीय लोकसभा अध्यक्षांच्या परवानगीने संसद संकुलात हलविण्यात आले होते. संसद संकुलातून कोणत्याही महान नेत्यांचे पुतळे हटविण्यात आले नाहीत.त्यांचे पुतळे संसद संकुल परिसरात पद्धतशीरपणे आणि आदरपूर्वक प्रतिष्ठापित केले जात आहेत.
संसद भवनातील या बदलांबाबत कोणत्याही राजकीय पक्षांशी चर्चा नाही
लोकसभा सचिवालयाच्या या निवेदनानंतर कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी शुक्रवारी पुन्हा टिकास्त्र सोडले आहे. आपल्या कालच्या ट्वीटमुळे गोंधळलेल्या लोकसभा सचिवालयाला पुर्णत: बोगस आणि तयार केलेले स्पष्टीकरण देण्यास भाग पाडल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. तसेच संसद भवनातील या बदलांबाबत कोणत्याही राजकीय पक्षांशी चर्चा करण्यात आली नसल्याचा आरोप करत टीडीपी-जदयुसह भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. हे पुतळे अशा ठिकाणी होते जिथे टीडीपी(तेलुगु देशम पार्टी) आणि जनता दल(युनायटेड) सह विरोधी पक्ष गेल्या १० वर्षांपासून मोदी सरकारच्या विरोधात शांततापूर्ण आणि लोकशाही पद्धतीने निदर्शने करत होते. यामुळे संसदेच्या बाहेर सरकारच्या विरोधात निषेध करण्यासाठी अशी कोणतीही जागा त्यांना ठेवू द्यायची नसल्याचा आरोपही जयराम रमेश यांनी केला. ही भाजपची स्टंटबाजी असल्याचे म्हणत त्यांच्या अस्थिर सरकारला कोसळण्यापासून वाचवू शकणार नाही असा घणाघात त्यांनी भाजपवर केला आहे.