Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
९ जूनला होणाऱ्या सोहळ्याची व्यवस्था राष्ट्रपती भवनाकडून करण्यात येईल तोपर्यंत आम्ही एनडीएकडून मंत्रिमंडळाची यादी राष्ट्रपतींना सादर करु अशी माहिती मोदींनी दिली. निवडणुकीचे आणि निकालाचे महत्त्व अधोरेखित करताना मोदींनी नमूद केले की यंदाची निवडणूक स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरची पहिली निवडणुक आहे. ‘लोकांनी तिसऱ्यांदा एनडीए सरकारला देशसेवेची संधी दिली आहे’ असा मोदींनी आवर्जून उल्लेख केला. गेल्या दोन टर्ममध्ये दिसलेला प्रगतीचा वेग कायम राहील, २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर येण्यासारख्या उल्लेखनीय कामगिरीसह आणखी देशाची मान उंचावेल अशी अनेक धोरण आम्ही राबवू अशी ग्वाही मोदींनी दिली.
जागतिक स्तरावर संकटे आणि तणाव असूनही भारत आर्थिक विकासात स्थिर आहे, “आम्ही भारतीय भाग्यवान आहोत की अनेक मोठी संकटे असतानाही, आज आपण जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून ओळखले जात आहोत. आमच्या विकासासाठी जगात आमची प्रशंसाही होत आहे.” असे गौरवउद्गार मोदींनी बोलून दाखवले.
जनतेच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना मोदींनी एनडीएला तिसऱ्यांदा काम करण्याची संधी दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले. तसेच आणखी गतीने आणि समर्पणाने देशाच्या इच्छा – आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही, अशी ग्वाही मोदींनी दिली. २०४७ मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करत असेल तेव्हा त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी ही यंदाची १८ वी लोकसभा एक मैलाचा टप्पा बनेल असे प्रतिपादन मोदींनी केले.