Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

West Bengal : काँग्रेस-डावे ठरले ‘वोट कटवा’; आघाडीमुळे १८ जागांवर भाजपचे नुकसान, तृणमूलचीही आठ जागांवर बिघाडी

7

वृत्तसंस्था, कोलकाता : लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत झाली. मात्र, यात काँग्रेस आणि डाव्या पक्षांची आघाडी उपद्रवी ठरली. या आघाडीमुळे सुमारे १८ जागांवर भाजपचे नुकसान झाले. तृणमूल काँग्रेसचीही या आघाडीने आठ जागांवर बिघाडी केली.लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीत असतानाही राज्यातील सर्व ४२ जागा स्वबळावर लढण्याची घोषणा ‘तृणमूल’ने केली होती. दुसरीकडे, काँग्रेसने पश्चिम बंगालसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासह (माकप) डाव्या पक्षांसोबत आघाडी केली. या आघाडीने बहुतांश जागांवर भाजप आणि तृणमूल या दोन्ही पक्षांना लागणाऱ्या अधिक्यापेक्षा अधिक मते मिळविली.

मोदी सरकारमधील मंत्री डॉ. एस. एस. अहलुवालिया यांना आसनसोल येथे ‘तृणमूल’चे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी ९२ हजार ५०५ मतांनी हरविले. तेथे ‘माकप’च्या उमेदवाराने लाखभर मते पटकाविली. भाजपच्या बड्या नेत्या व अभिनेत्री लॉकेट चॅटर्जी यांचा हुगळी येथे धक्कादायक पराभव झाला. त्यांच्याविरोधात ‘तृणमूल’च्या नेत्या व अभिनेत्री रचना बॅनर्जी यांनी ७६ हजार ८५३ मताधिक्य राखले. मात्र, तेथे ‘माकप’चे उमेदवार मनदीप घोष यांनी दीड लाखाच्या आसपास मते घेतली. हुगळीजवळील श्रीरामपूर येथे ‘माकप’मुळे ‘तृणमूल’चे विद्यमान खासदार कल्याण बॅनर्जी यांचा सलग तिसरा विजय सोपा झाला. तेथे विजयामध्ये पावणेदोन लाखांचा फरक राहिला. ‘माकप’च्या दीप्तिसा धर यांनी अडीच लाखापेक्षा अधिक मते पटकाविली. बॅरकपूरमध्ये विद्यमान भाजप खासदार अर्जुनसिंह यांना ६४ हजार ४३८ मतांच्या फरकाने पराभूत झाले. लाखापेक्षा अधिक घेणारा ‘माकप’चा उमेदवार त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरला.

केंद्रीय मंत्री नितीश प्रमाणिक यांचा कूंचबिहार येथे ३९ हजारांवर मतांनी पराभव झाला. तेथे डाव्या आघाडीतील ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकने ३० हजार २६७ तर काँग्रेसने दहा हजारपेक्षा अधिक मते घेतली. डमडम, हावडा, घाटल, जादवपूर, बर्धमान-दुर्गपूर, बांकुरा, मेदिनीपूर, जॉयनगर, कोलकाता उत्तर, कृष्णनगर, मुर्शिदाबाद येथेही भाजपचे मताधिक्य रोखण्यास काँग्रेस-डावी आघाडी कारणीभूत ठरली.

‘तृणमूल’लाही फटका

राज्यातील बालुरघाट, बनगाव, बर्धमान पूर्व, बिष्णुपूर, जलपैगुडी, कांथी, मालदा दक्षिण आणि मालदा उत्तर या आठ जागांवर काँग्रेस-डाव्या आघाडीने ‘तृणमूल’चे नुकसान केले. बिष्णुपूरमध्ये तर ‘तृणमूल’चा अवघ्या साडेपाच हजारांवर मतांनी पराभव झाला. तेथे ‘माकप’ने तब्बल लाखापेक्षा अधिक मते घेतली. काँग्रेस विजयी झालेल्या मालदा दक्षिणमध्ये तर तृणमूल तिसऱ्या स्थानी गेली.

काँग्रेसला अनपेक्षित अपयश

२०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या दोन जागा होत्या. यंदा त्यात एक संख्येने घट झाली. लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांना राजकारणात नवख्या असलेल्या युसूफ पठाण यांनी बेहरामपूर येथून हरविले. जंगीपूर येथे ‘तृणमूल’विरोधात लढताना काँग्रेस दुसऱ्या स्थानी राहिली.
West Bengal Election Result: बंगालमध्ये तृणमूलची ‘दीदी’गिरी; का खालावली भाजपची कामगिरी? ३५ जागांवरचा दावा सपशेल फेल
‘आयएसएफ’ची मुसंडी

इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) या तुलनेने नव्या असलेल्या पक्षाने लोकसभा निवडणुकीत सात जागा लढविल्या होत्या. या पक्षाने बरासत, बसिरहाट, मथुरापूर आणि उलुबेरिया या चार जागांवर अनपेक्षित मुसंडी मारली. या सर्व जागांवर ‘आयएसएफ ’ने दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली. तेथे चारही ठिकाणी ‘तृणमूल’ने यश मिळविले.

मतांचा लेखाजोखा (टक्क्यांमध्ये)
तृणमूल = ४५.६७
भाजप = ३८.७३
काँग्रेस-डावी आघाडी = १०.८२
अन्य / अपक्ष = ४.७८

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.