Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
जळगाव पोलीस भरती:व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पेपर सोडविण्याचा प्रयत्न ; धरणगाव पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा.. !
जळगाव:पोलीस शिपाई भरती परीक्षेचा लेखी पेपर आज असल्याने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील परीक्षा केंद्रात व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पेपर सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या परीक्षार्थी तरुणाला रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी कॉपी करणाऱ्या तरुणासह त्याला मदत करणाऱ्यांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
या संदर्भात अधिक वृत्त असे की, पोलिस शिपाई भरती २०१९ची प्रक्रीया सुरू झाली आहे. यात जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवर १२८ पदांसाठी आज ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता जळगाव व भुसावळ शहरातील ६८ केंद्रांवर २१ हजार ६९० उमेदवारांची १०० गुणांची बहुपर्यायी लेखी परिक्षा घेण्यात आली. कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातही परीक्षा केंद्र होते. याठिकाणी योगेश रामदास आव्हाड (रा.पांझनदेव, पोस्ट.नागापूर जि.नांदगाव) या परीक्षार्थी तरुणाने परीक्षा केंद्रात नजर चुकवून मोबाईल आणला होता. योगेशने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका आपल्या एका मित्राला पाठवली. त्यानंतर त्याच्या मित्राने प्रश्नांची उत्तर सोडवून त्याला पाठवायला सुरुवात केली. हा प्रकार स.पो.नि देवरे यांच्या लक्षात आल्यानंतर योगेशला तात्काळ परीक्षाकेंद्राच्या बाहेर नेत चौकशी करण्यात आली. याप्रकरणी योगेश रामदास आव्हाड आणि त्याचा मित्र (नाव निष्पन्न नाही) अश्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे कळते. दरम्यान, जळगाव तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरही कॉपी करणाऱ्या तरुणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असल्याचे कळते.
परीक्षा केंद्रांवर पेन, पेन्सील, रबर, प्रवेशपत्र व शासकीय कामकाजासाठी ग्राह्य असलेले फोटोचे “ओळखपत्र एवढ्याच वस्तु उमेदवारांनी आणने अपेक्षित होते. मोबाईल,पेजर सारख्या आक्षेपार्ह वस्तुंना बंदी घालण्यात आली होती. या वस्तु आणल्यास उमेदवारांना अपात्र ठरवण्यात येणार होते.