Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Akhilesh Yadav Resigns : खासदार अखिलेश यादव यांचा आमदारकीचा राजीनामा,नव्या समीकरणांद्वारे आगामी विधानसभांसाठी भाजपला इशारा
मंगळवारी एका पत्रकारपरीषदेदरम्यान त्यांनी करहाल विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले होते.यावेळी ते म्हणाले होते की, ‘मी करहाल व मेनपूरी येथील कार्यकर्त्यांना भेटलो आहे आणि त्यांना मी दोन निवडणूका जिंकल्याने मला एका जागेवरुन राजीनामा देणे भाग असल्याचे सांगितले आहे.’ दरम्यान पुढील विरोधी पक्षनेता कोण असेल असा प्रश्न केला असता ते म्हणाले होते की, ‘याचा निर्णय पक्षाकडून अशा प्रकारे घेतला जाईल जेणेकरुन त्याचा फायदा पक्षाच्या मतांमध्ये वाढ होण्यात होईल.’ अखिलेश यांचे हे वक्तव्य उत्तर प्रदेश मधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने नव्या समीकरणांचे सूचक आहे.
काय असेल आगामी समीकरण
उत्तर प्रदेशमधील सत्तास्थानी असलेल्या व प्रभावशाली समजल्या जाणाऱ्या भाजपला शह देत सपा,कॉंग्रेस यांनी इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या एकूण ८० जागांपैकी ४४ जागा जिंकत तेथील राजकारणात एका नव्या प्रवाहाला सुरुवात केली आहे.यामध्ये भाजपच्या उमेदवारांना तगडी टक्कर देत समाजवादी पक्ष सर्वाधिक ३७ जागांवर विजयी ठरला.भाजपसह एनडीएला केवळ ३६ जागांवर गड राखता आला.२०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तब्बल ६२ जागांवर विजयी ठरलेल्या भाजपसाठी हा खूप मोठा धक्का आहे.समाजवादी पक्षासाठी हा विजय अभुतपर्व समजला जात आहे.या ताज्या निकालांचा विधानसभा निवडणुकांच्या अनुशंगाने विश्लेषण करता सपा-कॉंग्रेसची ही आघाडी कायम राहिल्यास इंडिया आघाडीला विधानसभेतील एकूण ४०३ जागांपैकी २२५ जागी विजय मिळू शकतो.तर भाजपला जवळपास १७५ जागा मिळू शकतात.यामध्ये समाजवादी पक्ष हा प्रमुख कामगिरी बजावू शकतो.त्यामुळे आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप-एनडीएला शह देण्यासाठी समाजवादी पक्ष एका मजबूत समीकरणाच्या तयारीत आहे.
‘पीडीए फॅक्टरचं’ सोशल इंजिनिअरींग
या लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर भारतात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे पीडीए अर्थात पिछडा,दलित आणि अल्पसंख्यांक मतदार होय.बहुजन समाज पार्टीचा एकेकाळचा ‘कोअर वोटर’ काबीज करण्यात समाजवादी पक्ष यशस्वी ठरला. भाजपकडून संविधान बदलाची वारंवार केली जाणारी वक्तव्ये आणि अल्पसंख्यांप्रतीचं भाजपचं द्वेषपूर्ण वर्तन याला कारणीभूत ठरल्याचं अनेक राजकीय विश्लेषक नमुद करतात.या निवडणूकीत प्रभावी ठरलेला हा ‘पीडीए फॅक्टर’ आगामी विधानसभा निवडणूकीतही फायदेशीर ठरु शकतो असा समाजवादी पक्षाला विश्वास आहे.त्यामूळे अखिलेश यादव यांच्या वक्तव्याप्रमाणे त्याची प्रचिती उत्तरप्रदेश विधानसभा विरोधीपक्षनेते पदाच्या निवडीतून दिसू शकते.अखिलेश यादव यांच्या राजिनाम्याने त्यांचे विरोधीपक्षनेतेपद सुद्धा संपुष्टात आले आहे व ते लोकसभेमध्ये पक्षाचे संसदीय नेते होत असल्याने आगामी विधानसभांसाठीचं सोशल इंजिनियरींग म्हणून समाजवादी पक्षाकडून विरोधीपक्षनेतेपदासाठी दलित,मुस्लीम किंवा बिगर यादव व्यक्तीची निवड केली जावू शकते.