Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मेळघाटातील आरोग्यविषयक प्रश्न सोडविण्यासाठी विशेष मोहिम राबविणार – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय – महासंवाद
- मेळघाटातील बालमृत्यू, मातामृत्यूबाबत प्रशासनाकडून चौकशी
- गर्भवती महिला व बालकाच्या मृत्यूसंबंधी एसआयटीकडून चौकशी
- दोषींवर कारवाई प्रस्तावित होणार
अमरावती, दि. 13 : मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू व मातामृत्यू या आरोग्यविषयक प्रश्नांना कायमस्वरुपी सोडविण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. धारणी तालुक्यातील गर्भवती महिला व तिच्या बालकाचा मृत्यू या घटनेसंबंधी विशेष चौकशी पथकाकडून चौकशी केल्या जात असून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई प्रस्तावित करण्याचे निर्देश डॉ. निधी पाण्डेय यांनी आज दिले. तसेच अशा प्रकारची दुर्दैवी घटना यापुढे घडू नये म्हणून आरोग्य विभागाने सर्व आरोग्य केंद्र तसेच उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सेवा-सुविधा उपलब्ध ठेवाव्यात, अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी सदर बैठकीत दिल्या.
विभागीय आयुक्तांच्या दालनात आयोजित बैठकीत मेळघाटातील आरोग्य विषयक बाबींचा व मान्सून पूर्वतयारीचा डॉ. पाण्डेय यांनी सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. उपायुक्त(सामान्य प्रशासन) संजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी सुभाष ढोले व संबंधित वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, गत काही दिवसापासून मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू व मातामृत्यू या विषयासंबंधी अनेक बातम्या वृत्तपत्रातून प्रसिध्द झाल्या आहेत. त्यानुषंगाने परिस्थितीचे गांर्भीय समजून आवश्यक उपाययोजनांसाठी तातडीची बैठक घेण्यात येत आहे. मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू व मातामृत्यू या प्रश्नाबाबत विविध कारणे समोर आली आहेत. कमी वयात लग्न, शरीरात हिमोग्लोबीनची कमतरता, प्रसुतीदरम्यान अधिक रक्तस्त्राव, रुग्णालयात प्रसूती न होणे, कमी वजनाचे बाळ, उपजत मृत्यू, जंतू संसर्ग आदी प्रमुख कारणांमुळे मेळघाटात कुपोषण, बालमृत्यू व मातामृत्यूचे प्रमाण अधिक आहे. मेळघाटातील जनतेचे आरोग्यविषयक अडचणींचे निराकरण व्हावे याकरिता आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. मेळघाटातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर व उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना आवश्यक असलेल्या सेवा-सुविधा पुरविण्यात याव्यात, आवश्यकतेनुसार खाटांची संख्या वाढविण्यात यावी, जीवनावश्यक औषधी व लसींचा साठा मुबलक प्रमाणात ठेवावा, याबाबत सूचना त्यांनी दिल्या. त्यासाठी आवश्यकतेनुसार जिल्हा वार्षिक योजना, तसेच शक्य असेल तेथे सीएसआर फंडातून निधीची तरतूद करावी. तसेच आवश्यक वैद्यकीय उपचार साहित्यांच्या उपलब्धतेसाठी शासनाकडे मागणीचे प्रस्ताव सादर करण्यात यावेत. मेळघाटातील आरोग्यविषयक उपाययोजनांचा नियमितपणे प्रत्यक्ष भेटी व बैठकीच्या माध्यमातून आढावा घ्यावा, असे डॉ. पाण्डेय यांनी यावेळी सांगितले.
पावसाळ्यात मेळघाटातील दुर्गम व अतिदुर्गम गावांचा संपर्क तुटतो. त्यानुषंगाने तत्परतेने आरोग्य सुविधा रुग्णांना उपलब्ध करता याव्यात किंवा रुग्णांना आरोग्य केंद्रात पोहोचता यावे, यासाठी आताच पर्यायी रस्त्यांचे नियोजन करुन ठेवावे. त्यासंबंधी तेथील गावकऱ्यांना व आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात यावे. आरोग्य केंद्रात पुरेसा औषधी, सर्पदंश, रॅबीज आदी लसींचा साठा उपलब्ध ठेवावा. 102, 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका सुस्थितीत ठेवून वाहनचालक नेहमी उपस्थित राहील याची संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. गर्भवती महिलांची प्रसूती आरोग्य केंद्रात, रुग्णालयातच होण्यासाठी संबंधितांना कर्मचाऱ्यांकडून समुपदेशन करण्यात यावे. अंगणवाडी सेविका, आशाताई यांच्याकडून गर्भवती महिला, कुपोषित बालके, नवबालके यांचे नियमितपणे सर्वेक्षण व तपासणी करण्यात यावी. आदिवासी बांधव-भगिनींचे अडचणी व प्रश्न पूर्ण संवेदनशिलतेने सोडवावेत, अशा सूचना डॉ. पाण्डेय यांनी यावेळी दिल्या.
धारणी येथील ब्लड बँकच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून ब्लड बँक स्थापित करण्याचे काम शीघ्रगतीने करावे, अशा सूचना डॉ. पाण्डेय यांनी आरोग्य विभागाला दिल्या.
ब्लड बँकेसाठी आवश्यक असणारे शीतकरण यंत्र, विद्युत पुरवठा व उर्वरित किरकोळ स्थापत्य बांधकाम आदी कामे अखेरच्या टप्प्यात असून जून अखेरपर्यंत पूर्णत्वास जाणार आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यात ब्लड बँक पूर्णरित्या कार्यन्वित होईल. मेळघाटातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारासंबंधी औषधोपचाराच्या दृष्टीने आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आरोग्य केंद्र, रुग्णालयात पुरेसा औषधींचा साठा उपलब्धतेसाठी सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सौंदळे यांनी यावेळी बैठकीत दिली.
0000