Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आमदार निधी अंतर्गत केलेल्या विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आमदार मंदा म्हात्रे यांनी बेलापूर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक आपल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित राहिल्याने भाजप कार्यकर्त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. अखेरीस नवी मुंबईतील दादा व ताईंमध्ये दिलजमाई साधण्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना यश आल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
नवी मुंबईतील ताई-दादांचे भांडण सर्वश्रूत आहे. जेव्हा दादा-ताई राष्ट्रवादीत होत्या, तेव्हा राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांना देखील दादा-ताईंचे भांडण शमवण्यात यश आलं नव्हतं. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मंदा म्हात्रे या भाजपमध्ये दाखल झाल्या. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री गणेश नाईक यांनी देखील भाजपची कास धरली. मात्र, एकाच पक्षात राहून देखील नवी मुंबईतील दादा-ताईंचे वाद काही न काही कारणास्तव गाजत राहिले.
काही दिवसांपूर्वी तर आमदार मंदा म्हात्रे यांनी एका कार्यक्रमात भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून पक्षातील महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जाणून बुजून डावलण्यात येत असल्याचे सांगत आमदार गणेश नाईक यांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला होता. जर आपल्या मतदारसंघात बाहेरचे कोणी घुसखोरी करुन स्वत:ची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर आपणही शांत बसणार नसल्याचा इशारा मंदा म्हात्रे यांनी दिला होता.
त्यानंतर एका पत्रकार परिषदेत आमदार मंदा म्हात्रे यांनी पक्षातील स्थानिक नेते भाजपमधून आपलाच पत्ता कट करण्यासाठी कारस्थाने रचत आहेत, त्यांना धडा शिकवण्यासाठी आता आपण फक्त बेलापूर मतदारसंघापुरती कार्यरत न राहता संपूर्ण नवी मुंबई क्षेत्रातील जनतेचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे नवी मुंबईतील दादा-ताईंमधील वाद सोडवण्यात भाजपला अपयश आल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती. नवी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक तोंडावर आली असताना नवी मुंबई भाजपातील अंतर्गत वाद पक्षाला घातक ठरण्याची भीती कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे व्यक्त केली होती. त्यानंतर अचानक मंगळवारी आमदार निधीअंतर्गत केलेल्या कामाचा लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त आमदार मंदा म्हात्रे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नवी मुंबईत निमंत्रित केले.
आमदार मंदा म्हात्रे यांच्या कार्यक्रमास गत दोन वर्षात पहिल्यांदाच गणेश नाईक त्यांच्या कार्यकर्त्यांसह उपस्थित राहिल्याने व त्यांनी आपल्या भाषणात आमदार मंदा म्हात्रे यांच्या कार्याचे कौतुक केल्याने उपस्थित भाजप कार्यकर्ते देखील अचंबित झाले होते. परिणामी देवेंद्र फडणवीस यांनी दादा-ताईंमध्ये दिलजमाई घडवून आणल्याची चर्चा नवी मुंबईत दिवसभर सुरू होती.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणूक पक्षातील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन लढवली तर महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.