Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सॅन होजे, कॅलिफोर्निया
मायभूमीपासून दूर मराठी संस्कृती जपणारे कलाकार, लेखक, रसिक मंडळींच्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाला (बीएमएम) आज, शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे सहा हजारांहून अधिक मराठी भाषक या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत. ‘महाराष्ट्र टाइम्स’ या अधिवेशनाचा मीडिया पार्टनर आहे.
इंटरनेट ही जिथे स्वप्नवत गोष्ट होती, टेलिफोनवर बोलणे जिथे दुरापास्त होते अशा काळात ज्यांनी अमेरिकेची वाट धरली, त्या पिढीने मातृभूमीच्या ओढीने, संस्कृती आणि भाषेवरील प्रेमापोटी आपली मायभूमीच परक्या देशात उभी केली. अमेरिकास्थित मराठी मंडळींनी उभे केलेले भव्यदिव्य बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण. या बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन २७ ते ३० जून या कालावधीत सॅन होजे कन्व्हेन्शन सेंटर येथे होत आहे. अमेरिकेतील वेळेनुसार, २८ जून रोजी सकाळी ९ वाजता या अधिवेशनाचे उद्घाटन होईल.
अमेरिकेच्या बे एरियामध्ये मराठी माणसांचा टक्का नजरेत भरावा असा आहे. मराठी माणसाने या भागात आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवली आहे. याच परिसरात गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक मराठी भाषकांनी बीएमएम अधिवेशनासाठी अपार मेहनत घेतली असून ही मेहनत मूर्त स्वरूपात येत आहे. बीएमएमचे अध्यक्ष संदीप दीक्षित आणि अधिवेशनाचे समन्वयक भालेराव यांच्या पुढाकारातून हे संमेलन साकारत असताना, तिथे रुजलेल्या व नव्याने रुजू पाहणाऱ्या मराठी तरुणांचा त्यातील सहभाग लक्षणीय आहे.
या अधिवेशनासाठी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेण्यात येत आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बीएमएमच्या अधिवेशनाबद्दलचे कुतूहल सर्वदूर पोहोचवण्याचे आणि मराठी भाषकांना जोडण्याचे काम वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने होत आहे. बे एरियात ‘काय बे’ अशी आपुलकीची साद घालणारे हे अधिवेशन आहे.
कार्यक्रमस्थळी गुढी उभारण्यात आली असून रांगोळी आणि तुळशी वृंदावन पाहत उपस्थित रसिक मराठमोळ्या वातावरणाचा अनुभव घेत आहेत. अधिवेशासाठी येणाऱ्या खास पाहुण्यांचे भारतीय संस्कृतीनुसार ओवाळून स्वागत केले जात आहे. या अधिवेशनासाठी उपस्थित राहणाऱ्या सहा हजार लोकांसाठी सहा हजार लाडू वळले जात आहेत. गुरुवारी २७ जून रोजी ‘उत्तररंग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा ज्येष्ठांबद्दल विचार करणारा कार्यक्रम असून अमेरिकेत आलेल्या पहिल्या, दुसऱ्या पिढीतील मंडळीच्या उत्तर आयुष्याच्या प्रश्नांवर चर्चाविनिमय करणार महत्त्वाचा कार्यक्रम आहे.
मराठी उद्यमशीलतेला बळ देणारा ‘बी कनेक्ट’ हा कार्यक्रम इथे रूजू पाहणाऱ्या मराठी व्यवसायिकांना साहाय्यकारी ठरणार आहे. शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल, शाळा आणि जागतिक मराठी संस्था असे उद्बोधक विषय या अधिवेशनात आहेत. तसेच अधिवेशनात एकांकिका स्पर्धाही रंगणार आहेत. उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला ‘सारेगम’मधून मनामनात पोहोचलेल्या गायकांनी मराठी गीतांचा गोडवा सादर केला.