Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबई, दि. 27 : शेतात हळद लावण्यापूर्वी कोळपे वापरून सरी काढण्यासाठी आपल्याकडे बैल जोडी नाही म्हणून भावाला व आपल्या मुलाला कोळप्याला जुंपणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बालाजी पुंडगे यांना आज त्यांच्या बांधावर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बैल जोडी भेट पाठवली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याच्या शिरळे गावातील बालाजी पुंडगे या शेतकऱ्याकडे दोन एकर शेती आहे. दोन एकर शेतीसाठी बैल जोडी घेणे परवडत नाही आणि ऐन वेळेला कोणी बैल देत नाही म्हणून पावसाच्या भीतीने हळद लावण्यापूर्वी घाई गडबडीत सरी काढण्यासाठी शेतकऱ्याने स्वतःच्या भावाला व मुलाला चक्क कोळप्याला जुंपले होते. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती व या शेतकऱ्याला मदत करण्याच्या संदर्भात विविध प्रसिद्धी माध्यमांनी हे वृत्त प्रदर्शित केले होते.
वृत्ताची दखल घेत मंत्री श्री. मुंडे यांनी कृषी विभागाचे अधिकारी व हिंगोली जिल्ह्यातील सहकारी यांच्या मदतीने या शेतकऱ्याच्या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्यानंतर आज श्री. मुंडे यांच्या वतीने बी. डी. बांगर हे थेट बैलजोडी घेऊन बालाजी पुंडगे यांच्या शेतात पोहोचले. पुंडगे परिवाराच्या आनंदाला यावेळी सीमा उरली नव्हती.
दरम्यान मंत्री श्री. मुंडे यांनी बालाजी पुंडगे यांच्याशी दूरध्वनीवरून संवादही साधला, यावेळी धनंजय मुंडे यांनी आपण बैल जोडी पाठवत असून शेतातील कामांसाठी आपण कृषी विभागाकडे संबंधित योजनेतून ट्रॅक्टर साठी देखील अर्ज करावा, असे बालाजी पुंडगे यांना म्हटले. तर बालाजी पुंडगे यांनी सुद्धा आपल्या शेताबरोबरच इतरांच्या शेतामध्ये सुद्धा काम करून आपण या बैलजोडीचा सांभाळ करू; असा शब्द धनंजय मुंडे यांना दिला. यावेळी बी.डी.बांगर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कृषी विभागाचे अधिकारी हे शिरळे गावात उपस्थित होते.
0000
दत्तात्रय कोकरे/विसंअ/