Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना; १५ जुलैपर्यंत लाभार्थ्यांनी आधार पडताळणी करण्याचे आवाहन

8

मुंबई, दि. 2 – राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत योजनेअंतर्गत  साहित्य आणि प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील पन्नास वर्षावरील जेष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्यात येते. या योजनेअंतर्गत ३४ हजार ६०० कलाकार व साहित्यिक यांचा समावेश असून त्यांना एप्रिल २०२४ पासून सरसकट ५ हजार रुपये एवढे मानधन देण्यात येत आहे. ही प्रत्यक्ष लाभाची योजना असल्यामुळे, प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणाली द्वारेच मानधन अदा करण्याबाबत राज्य शासनाचे धोरण आहे. त्यानुसार, राज्यातील या योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या लाभार्थ्यांची आधार पडताळणी राहिली असेल, त्या सर्व लाभार्थ्यांनी १५ जुलै २०२४ पर्यंत त्यांची आधार पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.

आतापर्यंत या योजनेतील १५ हजार २११ लाभार्थ्यांनी आधार पडताळणी पूर्ण केलेली आहे. ज्या लाभार्थ्यांनी आधार पडताळणी केलेली आहे, त्यांना माहे मे महिन्याचे मानधन डीबीटीमार्फत देण्यात आलेले आहे. ज्यांची आधार पडताळणी झालेली नाही त्या कलाकारांना विशेष बाब म्हणून मे महिन्याचे मानधन अदा करण्यात आले होते. प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे मानधन दिल्यामुळे कलाकारांना मानधन मिळण्यात कालापव्यय होणार नाही, लाभार्थ्यांना मानधनाबाबतची माहिती, मानधन मिळण्याच्या अगोदर व मानधन मिळाल्यानंतर मोबाईलवर संदेशाच्या रूपाने वेळोवेळी देता येईल, मानधन रक्कम खात्यात जमा होताना कोणतीही तांत्रिक चूक होणार नाही. मानधन मिळाले नाही किंवा परत गेले अशा प्रकारच्या बाबी घडणार नाहीत.

प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणाली अंतर्गत आधार क्रमांकाची पडताळणी करणे ही वैयक्तिक लाभार्थ्यांचीच जबाबदारी आहे, कारण अन्य कोणतीही व्यक्ती अशा प्रकारची पडताळणी करू शकत नाही. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी मोबाईल वरून किंवा सेतू सुविधा केंद्रातून आधार पडताळणी करणे आवश्यक आहे. आधार पडताळणी करण्याआधी लाभार्थ्यांनी आपला मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाला जोडणे आवश्यक आहे. आधार पडताळणी करण्यासाठी https://mahakalasanman.org/AadharVerification.aspx ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हास्तरावर उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग हे या समितीचे सदस्य सचिव असल्याने; ग्रामपंचायत किवा पंचायत समितीस्तरावरूनही याबाबत आपणास माहिती मिळू शकेल. यापुढे, ज्या कलाकारांची आधार पडताळणी झालेली आहे अशा कलाकारांच्या खात्यात विहित वेळेत मानधन जमा करण्यात येईल. ज्या कलाकारांची आधार पडताळणी प्रलंबित आहे, त्यांना मानधन जमा होण्यास विलंब लागू शकतो. आधार पडताळणी करण्याबाबत काही अडचणी आल्यास, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई तसेच पुणे/ नागपूर औरंगाबाद या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आधार पडताळणीसंदर्भात अडचणींसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई कार्यालय  – श्रीराम पांडे, सहसंचालक मो. ९४२१६४२६५१, संदीप बलखंडे, सहायक संचालक मो. ९७६३०६८०८३. जयश्री घुगे, कार्यक्रम अधिकारी मो. ९००४११५०८६, अक्षता बिर्जे अधीक्षक मो. ९८६९८३४९४६, पल्लवी कदम, उच्चश्रेणी लघुलेखक मो. ७५०७८७४९३०

पुणे विभागीय कार्यालय – श्वेता पवार, सहायक संचालक, मो. ९०२८९१२८३८. जान्हवी जानकर, अधीक्षक, मो. ९५४५४१४३४३, नरेंद्र तायडे, सहायक लेखा अधिकारी मो.९४२३११४४९९

नागपूर विभागीय कार्यालय – संदीप शेंडे, सहायक संचालक-मो.९४२१७८२८४८, प्रज्ञा पाटील, सहा. लेखा अधिकारी-८९२८१३०६२२

औरंगाबाद विभागीय कार्यालय – संदीप शेंडे, सहायक संचालक- मो.९४२१७८२८४८. सूर्यकांत ढगे, सहा. लेखा अधिकारी-९८२२३३४३२१

*****

दीपक चव्हाण/विसंअ/

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.