Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबई, दि. ३ : पीक विमा भरताना आधार कार्ड, सातबारा उतारा यावरील नावात अल्प बदल असला तरी विमा अर्ज स्वीकृत करण्यात येतील, असे कृषी विभागाने कळविले आहे.
यावर्षीपासून पीक विमा योजनेत भाग घेण्यासाठी आधार कार्ड, बँक खाते व ७/१२ यावर नाव एकसारखे असणे आवश्यक आहे. यात किरकोळ जरी बदल असेल तरी विमा योजनेत सहभागी होता येणार नाही, अशा आशयाचा संदेश व्हॉट्सॲपद्वारे फिरत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
आधार कार्ड व बँक खात्यात बहुतेक नावे सारखी असतात. परंतु ७/१२ वर कधीकधी नावात किरकोळ बदल असतो. असे असले तरी विमा अर्ज भरण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. नावात थोडासा बदल असल्यास हरकत नाही. मात्र पूर्ण नाव, आडनाव वेगळे असल्यास चालणार नाही. नावात असलेला बदल विमा कंपनी मार्फत तपासला जाईल आणि तपासणीअंती अर्ज स्वीकृतीबाबत पुढील कार्यवाही केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी गोंधळून जाऊ नये.
शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकाचा आणि लागवड असलेल्या क्षेत्राचाच विमा घ्यावा. विमा घेतलेले पीक प्रत्यक्षात शेतात आढळले नाही तर विमा अर्ज नामंजूर होईल. शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी शक्यतो ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत पूर्ण करावी. दिनांक २ जुलै २०२४ पर्यंत सुमारे ५७ लाख विमा अर्ज प्राप्त झाले आहेत. खरीप हंगामात विमा घेण्यासाठीचा अंतिम दिनांक १५ जुलै २०२४ आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा तातडीने उतरवून घ्यावा. असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे .
सामायिक सुविधा केंद्राच्या (CSC) माध्यमातून विमा अर्ज भरताना शेतकऱ्यांनी प्रति अर्ज एक रुपया प्रमाणे शुल्क देणे अपेक्षित आहे. यासाठी शेतकऱ्याने स्वतःचा सातबारा आठ अद्ययावत उतारा व इतर कागदपत्रे बरोबर घेऊन जाणे अपेक्षित आहे. याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्काची मागणी सामायिक सुविधा केंद्र चालकाने केल्यास याबाबत तक्रार खालील टोल फ्री क्रमांक वर करण्यात यावी, याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे कळविण्यात आले आहे.
सीएससी गव्हर्नर सर्विसेस इंडिया लिमिटेड
टोल फ्री क्रमांक :- १४५९९/१४४४७
व्हाट्सअप क्रमांक :- ९०८२६९८१४२
तक्रार नोंद क्रमांक :- ०११- ४९७५४९२३ /४९७५४९२४
0000
दत्तात्रय कोकरे/विसंअ