Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Hathras Stampede: चेंगराचेंगरीची न्यायालयीन चौकशी होणार; योगी आदित्यनाथ यांची घोषणा, मृतांचा आकडा १२१वर

12

वृत्तसंस्था, हाथरस : हाथरस येथे मंगळवारी एका सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीची न्यायालयीन चौकशी केली जाणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी ही घोषणा केली. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी होईल. या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा १२१वर पोहोचला आहे.

हाथरस जिल्ह्यातील फुलरई गावात भोले बाबा यांच्या सत्संगावेळी ही दुर्घटना घडली. सत्संग संपल्यानंतर भाविक परतत असताना चेंगराचेंगरी झाल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात येणाऱ्या समितीमध्ये पोलिस तसेच प्रशासनातील निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश असेल. या दुर्घटनेस कोण जबाबदार आहे अथवा यामागे काही कटकारस्थान आहे का, याबाबत ही समिती तपास करेल, असे आदित्यनाथ यांनी सांगितले. या प्रकारच्या दुर्घटनांची भविष्यात पुनरावृत्ती होऊ नये, याची सरकारतर्फे काळजी घेतली जाईल. तसेच, एवढ्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या कोणत्याही मेळाव्यांसाठी प्रमाणित कार्यप्रक्रिया निश्चित करणेही सरकारच्या विचाराधीन आहे, असे ते म्हणाले.

या दुर्घटनेतील मृतांमध्ये राज्याबाहेरील सहा जणांचा समावेश आहे. यापैकी चार जण हरयाणाचे तर, मध्य प्रदेश व राजस्थानचे प्रत्येकी एक जण आहेत, अशी माहिती सरकारतर्फे देण्यात आली. या सत्संगाबाबतची आणखी माहिती बुधवारी समोर आली. पोलिसांनी या सत्संगाच्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ८० हजार नागरिकांना सामावून घेण्याची क्षमता असणाऱ्या संबंधित स्थळी अडीच लाख नागरिकांना गोळा करण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ (निष्काळजीमुळे मृत्यूस कारणीभूत ठरणे), ११० (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे), १२६ (२) (चुकीच्या पद्धतीने रोखणे), २२३ (सरकारी अधिकाऱ्यांचा आदेश न पाळणे), २३८ (पुरावे नष्ट करण्यास कारणीभूत ठरणे) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

यातील जखमी तसेच, मृतांच्या नातेवाइकांची बुधवारीही रुग्णालयांबाहेर गर्दी होती. अद्यापही ठावठिकाणा न लागलेल्यांचा शोध सुरू होता, तसेच मृतांची ओळख पटवण्याचेही काम सुरू होते. या संपूर्ण परिसरावर बुधवारीही शोककळा होती व नातेवाइकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.

हा सत्संग दुपारी साधारण २ वाजता संपला. त्यानंतर भोले बाबा आपल्या कारकडे जात असताना अनेक भाविक त्यांच्या पायाची धूळ माथी लावण्यासाठी त्यांच्या दिशेने धावत गेले. त्यातील काही जण घसरून पडले, त्यांच्या अंगावर मागून येणारे पडले व त्यानंतर काही कळायच्या आत मोठी चेंगराचेंगरी झाली, अशी माहिती काही उपस्थितांनी दिली.

मृतांमध्ये बव्हंशी महिला

यातील मृतांचा आकडा १२१वर पोहोचला असून अद्याप चार मृतांची ओळख पटणे बाकी आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची संख्या २८ आहे. यातील मृतांचा आकडा ११६ असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले होते. विशेष म्हणजे, यामध्ये १०८ महिलांचा समावेश असून उर्वरित मृतांमध्ये सात मुले व एक पुरुष आहे. मृत महिला या प्रामुख्याने ४० ते ५० वर्षे वयोगटातील आहेत. दुर्घटनास्थळी असणाऱ्या चपलांच्या ढिगावरून या दुर्घटनेची भीषणता लक्षात येत होती.
Hathras Stampede: खोलीत फक्त तरुणींना प्रवेश, हाथरस सत्संग दुर्घटनेनंतर भोले बाबाचं गुपित उघड
आश्रमाबाहेर पोलिस बंदोबस्त

मैनपुरी : या दुर्घटनेनंतर पोलिसांनी भोले बाबा यांच्या येथील आश्रमाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला आहे. भोले बाबा ऊर्फ नारायण हरी हे आश्रमातच असल्याचे सूत्रांनी सांगितले, परंतु पोलिसांनी त्याबाबत काहीही माहिती दिली नाही.

सर्वोच्च न्यायालयात याचिका

नवी दिल्ली : हाथरस सत्संग दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली पाच तज्ज्ञांची समिती नेमावी अशी मागणी करणारी एक याचिका बुधवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. अॅड. विशाल तिवारी यांनी ही याचिका केली आहे. उत्तर प्रदेश सरकारला २ जुलैपर्यंत स्थितीदर्शक अहवाल सादर करण्यासाठी, तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात निष्काळजीप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू करण्यासाठी निर्देश द्यावेत, अशी विनंतीही यात करण्यात आली आहे.

‘सेवेकरी पळून गेले’

‘ही दुर्घटना घडल्यानंतर अनेक जण मृत्यूच्या दारात होते. त्यामुळे तेथील सेवेकऱ्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात न्यायला हवे होते. परंतु ते तेथून पळून गेले’, अशा शब्दांत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नाराजी व्यक्त केली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.