Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

चमत्कारी ‘भोले बाबा’ बेपत्ता, मुख्य सेवेकऱ्याचीही शोधमोहीम सुरु, १२१ जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

10

वृत्तसंस्था, हाथरस : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीतील मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकर याच्यासह भोले बाबासाठी (सूरजपाल ऊर्फ नारायण साकार हरी) तपास यंत्रणांनी उत्तर प्रदेशबरोबरच अन्य राज्यांत शोधमोहीम तीव्र केली आहे.

हाथरसच्या फुलराई गावात दोन जुलैला झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी, पोलिसांनी देवप्रकाश मधुकर या मुख्य सेवेकऱ्यासह (सत्संगाचा मुख्य आयोजक) इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सहा सेवेकऱ्यांना अटक केली असून, त्यांची चौकशी सुरू आहे. मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकर हा फरार असल्याने त्याच्या शोधासाठी राजस्थान, हरयाणामध्ये पथके पाठवण्यात आली आहेत, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणातील ‘एफआयआर’मध्ये भोले बाबाच्या नावाचा उल्लेख नसला, तरी त्याची चौकशी करण्यात येणार आहे. त्याचाही राज्यासह अन्य ठिकाणी शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Hathras Stampede: चेंगराचेंगरीची न्यायालयीन चौकशी होणार; योगी आदित्यनाथ यांची घोषणा, मृतांचा आकडा १२१वर
हाथरसमध्ये २ जुलैला झालेल्या या दुर्घटनेत १२१ जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये बहुतांश महिला आहेत. या प्रकरणी विशेष तपास पथकाच्या प्राथमिक अहवालाबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना माहिती देण्यात आली आहे.

९० जणांचे जबाब

चेंगराचेंगरीचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने आत्तापर्यंत ९० जणांचे जबाब नोंदवले आहेत, अशी माहिती पथकाचे प्रमुख, पोलिस महासंचालक अनुपम कुलश्रेष्ठ यांनी शुक्रवारी दिली. चेंगराचेंगरीबाबतचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला असून, सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. तपासादरम्यान आढळलेल्या पुराव्यांवरून आयोजकांचा दोष दिसत असल्याचे कुलश्रेष्ठ यांनी सांगितले.

राहुल गांधींकडून दुर्घटनाग्रस्तांचे सांत्वन

हाथरस : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबीयांची शुक्रवारी सकाळी भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी या दुर्घटनेमागील प्रशासकीय त्रुटींवर बोट ठेवले. ‘या दुर्घटनेवरून मला राजकारण करायचे नाही. मात्र, या प्रकरणात प्रशासकीय हलगर्जी दिसून आली. सत्संगावेळी पोलिसांची पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती, याकडे काही दुर्घटनाग्रस्तांनी लक्ष वेधले आहे,’ असे राहुल यांनी सांगितले. मृतांच्या वारसांना तातडीने नुकसानभरपाई वितरित करावी, अशी मागणी राहुल यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली. राहुल यांच्या दौऱ्यावेळी उत्तर प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय, प्रभारी अविनाश पांडे, प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत आणि अन्य नेते उपस्थित होते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.