Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
चंद्रपूर, दि. 7 : भद्रावती तालुक्यातील कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड या खुल्या कोळसा खाणीमुळे बरांज मोकासा, चेक बरांज, तांडा आणि पिपरबोडी गावांचा गत 15 वर्षांपासून रखडलेला पुनर्वसनाचा प्रश्न राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने निकाली निघाला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून 328 कुटुंबांना 40 कोटींचे पुनर्वसन पॅकेज जाहीर झाले आहे. या अंतर्गत शुक्रवारी नियोजन भवन येथे 23 लाभार्थ्यांना 2 कोटी 73 लाखांचे धनादेश वाटप पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, महानगर पालिका आयुक्त विपीन पालीवाल, उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार (भुसंपादन), अतुल जटाळे (पुनर्वसन), डॉ. मंगेश गुलवाडे, देवराव भोंगळे, नरेंद्र जीवतोडे, रमेश राजुरकर, बरांज मोकासाच्या सरपंचा मनिषा ठेंगणे, प्रवीण ठेंगणे आदी उपस्थित होते.
कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड ही कोळखा खाण सन 2015 ते 2021 या कालावधीत बंद होती. खाण सुरू झाल्यानंतर कंपनीने प्रकल्पग्रस्तांना कोणताही मोबदला दिला नाही. प्रकल्पग्रस्त कुटुंबांना बंद काळातील पुनर्वसन पॅकेज मिळवून देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला. या संदर्भात त्यांनी थेट केंद्रीय कोळखा मंत्री श्री. रेड्डी यांची दिल्ली येथे भेट घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मांडल्या. अखेर बरांज मोकासा, तांडा आणि चेकबरांज, पिपरबोडी येथील 328 कुटुंबांना 40 कोटींचे पुनर्वसन पॅकेज जाहीर झाले.
यावेळी बोलतांना पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, मी कायम प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्रीय कोळसा मंत्री किशन रेड्डी यांना चंद्रपुरात आणून नागरिकांच्या अडचणी सोडविण्यात येतील. ज्यांना पुनवर्सन पॅकेज अंतर्गत धनादेश मिळाले त्यांनी हे पैसे सुरक्षित ठेवावे. उर्वरीत नागरिकांनासुध्दा धनादेशाचे वाटप करण्यात येणार आहे. कोणीही पुनर्वसन पॅकेजपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाहीसुध्दा पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली.
या लाभार्थ्यांना मिळाले पुनर्वसन पॅकेज : बरांज मोकासा येथील श्यामराव बालपाणे, दौलत बालपाणे, सुधाकर बालपाणे, दादाजी निखाडे, ताराबाई पालकर, बबन सालुरकर, एकनाथ तुळनकर, अशोक पुनवटकर, मायाबाई देवगडे, सुशीला डहाके, शंकर काथवटे यांना, चेकबरांज येथील सुर्यभान ढोंगे, सुमन ढोंगे, संजय ढोंगे, लक्ष्मण कोवे, नीळकंठ मेश्राम यांना तर नोकरीच्या ऐवजी एकरकमी मोबदला म्हणून देवराव परचाके, भाऊराव परचाके, विश्वनाथ जिवतोडे, काशिनाथ जिवतोडे, शशिकला चालमुरे, परसराम घाटे, हनुमान भोयर या सर्वांना एकूण 2 कोटी 73 लक्ष रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले.
मुख्यमंत्री सहायता निधीचे वाटप : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते स्वाती हर्षल पारखी आणि लता बाळू गेडाम यांना मुख्यमंत्री सहायता निधीचा प्रत्येकी 1 लक्ष रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आला.
0000