Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

महापुराचे सत्तर बळी! आसाममधील स्थिती ‘जैसे थे’; २९ जिल्ह्यांमधील २४ लाख लोकांना फटका

12

वृत्तसंस्था, गुवाहाटी : आसाममधील पूरस्थिती रविवारीही कायम होती. या नैसर्गिक आपत्तीचा जवळपास २४ लाख लोकांना फटका बसला आहे. राज्यभरात ब्रह्मपुत्रेसह अनेक प्रमुख नद्या धोकादायक पातळीवरून वाहत आहेत. पूर, भूस्खलन आणि वादळ या नैसर्गिक आपत्तीमधील मृतांची संख्या ७० झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्यातील २९ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला असून, धुबरी हा सर्वाधिक बाधित जिल्हा आहे. येथे ७.९५ लाखांहून अधिक लोक पुराच्या पाण्यात आहेत. कचार आणि दरांग या जिल्ह्यातील प्रत्येकी १.५० लाखांहून अधिक लोकांना फटका बसला आहे. विविध ठिकाणच्या ५७७ मदत शिबिरांमध्ये ५३ हजारांहून अधिक लोकांनी आश्रय घेतला आहे. ब्रह्मपुत्रेसह प्रमुख नद्या जोरहाट ते धुबरीपर्यंत राज्यभरात अनेक ठिकाणी धोकादायक पातळीवरून वाहत आहेत. बुर्हिदेहिंग, डिखौ, डिसांग, धनसिरी, जिया भराली, कोपिली, बराक आणि संकोश या नद्याही वेगवेगळ्या ठिकाणी पात्राबाहेर आल्या आहेत. वनक्षेत्रातील प्राणी आणि पक्ष्यांनाही या महापुराचा फटका बसला असून, मोठ्या प्रमाणात शेतजमीनही पाण्याखाली गेली आहे. राज्याच्या विविध भागातील रस्ते आणि पुलांसह पायाभूत सुविधांचेही नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बंगालमध्येही पूरसदृश स्थिती

जलपैगुडी/कोलकाता : उत्तर पश्चिम बंगालच्या जिल्ह्यांमध्ये संततधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, वाहतूकसेवा विस्कळित झाली आहे. जलपैगुडी शहरातील अनेक भाग पाण्याखाली आहेत. यामुळे किमान ३०० कुटुंबांनी कम्युनिटी हॉलमध्ये आश्रय घेतला आहे, असे जलपैगुडीच्या नगराध्यक्ष पापिया पाल यांनी सांगितले. दार्जिलिंग, कलिमपोंग, जलपैगुडी, कूचबिहार आणि अलीपुरद्वार या जिल्ह्यांमध्ये १२ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुलाचा मृतदेह सापडला

गुवाहाटी : शहरात गुरुवारी सायंकाळी नाल्यात पडलेल्या एका आठ वर्षांच्या मुलाचा मृतदेह बचाव पथकाला सुमारे चार किलोमीटर दूर सापडला. पालकांनी मृतदेहाची ओळख गुवाहाटी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पटवली आहे. पुढील तपासणीसाठी मुलाचे डीएनए नमुने गोळा करण्यात आले. अभिनाश सरकार (वय ८) हा वडील हिरालाल सरकार यांच्यासोबत गुरुवारी सायंकाळी मुसळधार पावसात घरी परतत असताना स्कूटरवरून घसरून उघड्या नाल्यात पडला होता. ‘एनडीआरएफ’ आणि एसडीआरएफसह अनेक संस्थांनी शोधमोहीम सुरू केली होती.

मदत शिबिरांना भेट

गुवाहाटी : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वशर्मा यांनी रविवारी कामरूप जिल्ह्यातील मदत शिबिरांना भेट देऊन पूरबाधित लोकांच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तीन मदत शिबिरांमध्ये संवाद साधत जिल्हा प्रशासनाला वैद्यकीय सुविधा, पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक मदत सामग्रीचा पुरवठा करण्याबाबत त्यांनी निर्देश दिले.

गोगोईंची शहांवर टीका

नवी दिल्ली : आसाममधील पूरपरिस्थितीबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली. ‘आसाममधील दुर्घटनेबाबत गृहमंत्री अमित शहा यांचे विधान ज्ञान आणि प्रामाणिकपणाची कमतरता दर्शवते. पुरामुळे ७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तरीही ते सध्याच्या आपत्तीचे वर्णन पूरसदृश परिस्थिती म्हणून करतात,’ असे गोगोई यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.