Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

महुआ मोइत्रांच्या अडचणीत वाढ; रेखा शर्मांवरील टिप्पणीमुळे खासदारकी धोक्यात? किती शिक्षेची तरतूद?

10

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : काही महिन्यांपूर्वीच एका प्रकरणात खासदारकी गमावणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या चर्चित खासदार महुआ मोइत्रा नव्या अडचणीत सापडल्या आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांच्यावर अशोभनीय टिप्पणी केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने मोइत्रा यांच्या खासदारकीवर पुन्हा टांगती तलवार लटकत आहे.

नव्याने अस्तित्वात आलेल्या भारतीय न्याय संहितेअंतर्गत दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या पहिल्याच एफआयआरच्या कचाट्यात मोइत्रा सापडल्या आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाने दिल्ली पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे २ जुलै रोजी भोले बाबा याच्या सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत १२०हून अधिक बळी गेले होते. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुतांश महिला होत्या. ४ जुलै रोजी रेखा शर्मा यांनी हाथरसला भेट दिली, तेव्हा एक व्यक्ती छत्री घेऊन त्यांच्या मागे जात असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यावर मोइत्रा यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, अशी तक्रार आहे. मोइत्रा यांनी नंतर ती पोस्ट हटवली. मात्र या प्रकाराची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ‘मोइत्रा यांची टिप्पणी अत्यंत अपमानास्पद आहे आणि महिलांच्या सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचे हे उल्लंघन आहे,’ असे तक्रारीत म्हटले होते. मोइत्रा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७९अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती, त्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी त्याच कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. दिल्ली पोलिसांनी स्वतःहून दखल घेतलेल्या या प्रकरणात त्वरित कारवाई करावी. येत्या तीन दिवसांत तुम्हाला मला तत्काळ अटक करण्याची गरज असल्यास मी नादियामध्ये आहे. मी स्वतःची छत्री स्वतः धरू शकते, असा पलटवार मोइत्रा यांनी केला.

किती शिक्षा होऊ शकते?

भारतीय न्याय संहितेच्या कलम ७९ नुसार, एखाद्या महिलेची प्रतिष्ठा कमी करणे, तिचा अपमान करण्याच्या उद्देशाने काहीही बोलणे, कोणताही आवाज करणे, कोणतेही हावभाव करणे किंवा स्त्रीच्या गोपनीयतेला बाधा आणणारी कोणतीही गोष्ट करणे, हे करणारा दोषी आढळल्यास त्याला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. दंडाच्या शिक्षेचीही तरतूद आहे. कायद्यानुसार, एखाद्या खासदाराला किंवा आमदाराला फौजदारी खटल्यात दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यास, त्याचे सदस्यत्व तत्काळ रद्द केले जाईल, असे लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ८(३)मध्ये म्हटले आहे.

‘ती’ पोस्ट मागवली
नवी दिल्ली: राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांच्याबाबत ‘एक्स’ या समाजमाध्यमावर अवमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी महुआ मोईत्रा अडचणीत आल्या आहेत, मोईत्रा यांच्या डिलिट केलेल्या ‘पोस्ट’चा तपशील दिल्ली पोलिसांनी सोमवारी ‘एक्स’कडून मागवला आहे. तसेच गरज भासल्यास मोईत्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.