Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्रातील माता-भगिनी आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर व्हाव्यात, यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांच्या आरोग्य आणि पोषणाची हमी घेणार आहे.
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्रासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली आहे.
राज्यातील महिला व मुलींना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर रोजगार निर्मितीस चालना देणे, महिलांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे, महिला व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र राहिलेल्या तिच्या स्वत:च्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) सक्षम बँक खात्यात दर महिन्याला 1,500 रूपये दिले जाणार आहे. तसेच केंद/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1,500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येणार आहे. याचाच अर्थ त्या महिलेला 1 वर्षात 18 हजार रूपये मिळणार आहेत.
या योजनेचा लाभ राज्यभरातील अधिकाधिक महिलांना घेता यावा यादृष्टीने आपल्या शासनाने अनेक अटी शिथिल करत या योजनेची प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे.या योजनेअंतर्गत आता 21 ते 65 या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना तसेच कुटुंबातील एका अविवाहित महिलेला दरमहा 1,500 रुपये दिले जाणार आहेत. यामुळे राज्यातील अनेक महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. जिथे अशक्य आहे, तिथे ऑफलाईन अंगणवाडी सेविका, सेतू सुविधा केंद्रात अर्ज जमा करता येईल. आणि घरच्या घरी मोबाईलवरुनही नारीशक्तीदूत अँपवरून ऑनलाईन अर्ज भरता येईल.
योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता :-
❖ २१ ते ६५ वर्ष वयोगटातील महिलांना लाभ
❖ लाभार्थी महिला महाराष्ट्राच्या रहिवासी असणे आवश्यक.
❖ लाभार्थी महिलेच्या बँक खाते असणे आवश्यक .
❖ लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रूपयांपेक्षा जास्त नसावे
❖ पिवळे व केशरी रेशनकार्ड असल्यास उत्पन्न दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे.
❖ विवाहित,विधवा, घटस्फोटीत,परितक्त्या, निराधार आणि कुटुंबातील एका अविवाहित महिलेला लाभ.
❖ योजनेचा लाभ मिळण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र नसल्यास 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला यापैकी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
❖ परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर विवाह केला असल्यास पतीचा जन्मदाखला, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
❖ योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
❖ लाभार्थी महिलेचे आधार कार्ड.
❖ महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्रातील जन्मदाखला
❖ सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंबप्रमुखाचा उत्पनाचा दाखला.
❖ बॅक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
❖ पासपोर्ट साईजचा फोटो.
❖ रेशन कार्ड
❖ या योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.
या योजनेत अर्ज कसा करता येईल ?
➢ ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल, त्याच्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये/ग्रामपंचायत/वॉर्ड/सेतू सुविधा केंद्रे येथे उपलब्ध आहे.
➢ अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतू सुविधा केंद्र/ग्रामपंचायत/ग्रामसेवक/ वार्ड अधिकारी यांनी ऑनलाईन प्रस्तावित केल्यावर लाभार्थी महिलेचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करता येईल
➢ अर्ज करण्याची प्रक्रिया विनामूल्य आहे.
➢ अर्जदार महिलेने स्वत: अर्ज करताना उपस्थित राहणे आवश्यक आहे जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई-केवायसी करता येईल.
महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटकांसोबत सर्व प्रवर्गातील महिलांसाठी राज्य शासन पाठीशी उभे आहे. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ अंमलात असून महिलांना आर्थिक आधार देण्यात येत आहे.
0000
-वर्षा फडके-आंधळे
वरिष्ठ सहायक संचालक ( माहिती)