Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
डेक्कन रोड परिसरातील सोसायट्या, वस्त्यांमध्ये पावसाचं पाणी शिरलं आहे. डेक्कन रोडवरील पुलाची वाडी परिसरात असलेल्या वस्त्यांमध्ये रात्री तीनच्या सुमारास पाणी शिरल्यानं रहिवाशांची तारांबळ उडाली. मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून ४० हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. पाणी सोडणार असल्याची कोणतीही कल्पना स्थानिक रहिवाशांना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे रहिवाशांची त्रेधा उडाली.
रहिवासी साखरझोपेत असताना घरांमध्ये पाणी शिरलं. नदीपात्राजवळ राहणाऱ्या रहिवाशांना याचा सर्वात मोठा फटका बसला. अवघ्या काही मिनिटांमध्ये घरं पाण्यानं भरुन गेली. पूर्वकल्पना देण्यात न आल्यानं नागरिकांना घरात असलेलं सामान वाचवण्यास वेळच मिळाला नाही. मध्यरात्री तीनच्या सुमारास घरात पाणी शिरलं. घरातील भांडी, अन्य वस्तू पाण्यावर तरंगू लागल्या. त्या वाहून जाऊ नये म्हणून अनेक जण दाराला कुलूप लावून घराबाहेर आले. अनेकांची इलेक्ट्रॉनिक उपकरणं, महत्त्वाची कागदपत्रं पाण्यात गेली.
पुण्यात गेल्या २४ तासांत ३७० मिलीमीटर पाऊस झाल्यानं दैना झाली आहे. अनेक भागांमध्ये ४ ते ५ फूट पाणी साचल्यानं वस्त्या पाण्याखाली गेल्या आहेत. धरणातून पाणी सोडणार असल्याची कोणतीही कल्पना आम्हाला दिलेली नव्हती. ती दिली असती तर आमचं नुकसान टळलं असतं. आता या पावसात आम्ही कुठे जाणार? कोणाकडे आश्रय घेणार? असा सवाल पुलाची वाडी परिसरात राहणाऱ्या महिलांनी विचारला.
‘माझं अख्खं घर बुडालंय. घरातलं सगळं सामान पाण्याखाली गेलंय. माझा मुलगा दहावीला आहे. त्याची पुस्तकं भिजली आहेत. लोकांची धुणीभांडी करुन मी घर चालवते. माझं प्रचंड नुकसान झालंय. ते कसं भरुन निघणार,’ असा सवाल पुलाची वाडी परिसरात राहणाऱ्या एका महिलेनं विचारला. ‘घरातलं सामान पाण्यावर तरंगतंय. ते वाहून जाऊ नये म्हणून मी घराला कुलूप लावून बाहेर आलेय. माझ्या सासूला दमा आहे. सकाळपासून त्या कुडकुडत आहेत. अंगावरचे कपडे भिजलेत. पण तेही बदलू शकत नाही,’ अशा शब्दांत याच भागात राहणाऱ्या महिलेनं तिची व्यथा मांडली.