Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Mobile Medical Unit: फिरता दवाखाना फिरेना! ४० वाहने वापराविना पडून; राज्यात २० जिल्ह्यांत आरोग्यसेवा ठप्प

7

म. टा. वृत्तसेवा, ठाणे : राष्ट्रीय आरोग्य मोहिमेंतर्गत राज्याच्या २० जिल्ह्यांमध्ये आरोग्यसेवा पुरविणाऱ्या फिरता दवाखाना पथकातील ४० वाहने ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात एका खासगी जागेत गेल्या वर्षभरापासून वापराविना उभी असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महाराष्ट्राच्या दुर्गम भागातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची अवस्था अतिशय दयनीय असताना २० जिल्ह्यांमधील आरोग्यसेवा ठप्प असल्याचे विदारक सत्य यानिमित्ताने उघड झाले आहे.करोना संकटकाळात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील रुग्णांपर्यंत आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य मोहिमेंतर्गत फिरते दवाखाने (मोबाइल मेडिकल युनिट) सुरू करण्यात आले होते. मार्च २०२१मध्ये ही योजना कार्यान्वित करण्यात आली. या फिरता दवाखाना पथकामध्ये एक मोठी बसगाडी आणि एक जीप अशी दोन वाहने तसेच डॉक्टर, परिचारिका, फार्मासिस्ट आदींचा समावेश होता. एक वैद्यकीय पथक दिवसभरात दोन ठिकाणी ८० रुग्णांना आरोग्यसेवा देत होते. २० फिरत्या दवाखान्यांद्वारे दिवसभरात दुर्गम भागातील १६०० रुग्णांची तपासणी होत होती. तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या गाड्यांचे लोकार्पण केल्याचे छायाचित्रही संकेतस्थळावर आहे. गेल्या वर्षभरापासून ही सेवा बंद असून कोट्यवधींची ४० वाहने मुरबाड तालुक्यातील सरळगावजवळील कान्हर्ले ग्रामपंचायत हद्दीतील खासगी जागेमध्ये पडून आहेत. ठाणे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत सार्वजनिक आरोग्यसेवा बळकट करण्याविषयी चर्चा सुरू असताना मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी आरोग्य विभागाच्या सेवेत असणारी कोट्यवधी रुपयांची ही वाहने वर्षभरापासून एका जागी वापराविना का पडून आहेत, असा प्रश्न उपस्थित केला.

राज्याच्या दुर्गम भागात आरोग्य सुविधांचा प्रश्न गंभीर आहे. ठाणे जिल्ह्याच्या दुर्गम भागातील अत्यवस्थ रुग्णांना झोळीत टाकून रुग्णालयात आणावे लागल्याचे प्रसंग उद्भवतात. असे असताना फिरत्या दवाखान्यांची ही सेवा गेल्या वर्षभरापासून ठप्प का, असा प्रश्न मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती दीपक पवार यांनी उपस्थित केला आहे.

संकेतस्थळावरील माहिती

राज्य आरोग्य संस्थेच्या संकेतस्थळावर या फिरत्या दवाखान्याच्या पथकाची (एमएमयू) माहिती मिळते. एका मोठ्या आकाराच्या बसगाडीमध्ये फिरता दवाखाना आणि सोबत वैद्यकीय पथकासाठी जीप असे तिचे स्वरूप आहे. त्याचप्रमाणे सर्वसाधारण आजारांची औषधेही पथकासोबत असतात. गंभीर स्वरूपाचे रुग्ण आढळल्यास पथकाद्वारे त्यांना उप जिल्हा रुग्णालयात अथवा अन्य योग्य ठिकाणी उपचारांसाठी हलवले जाते.

परवडत नसल्याने सेवा बंद

‘दुर्गम भागात सार्वजनिक आरोग्यसेवा पुरवण्याचे काम शासनाने २०२१मध्ये आमच्या कंपनीला दिले. त्यासाठी आम्ही १२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. दोन वर्षे आम्ही राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये सेवा दिली. दरम्यानच्या काळात इंधन आणि औषधांचा खर्च वाढला. त्यामुळे शासन देत असलेल्या निधीतून ही सेवा पुरवणे आम्हाला परवडेनासे झाल्याने गेल्या वर्षभरापासून आम्ही काम थांबवले आहे. शासनाने निधी वाढवून द्यावा यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. शासनासोबत आमचा पाच वर्षांचा करार आहे. या योजनेतील सर्व वाहने आमच्या मालकीची असून ती मुरबाडमधील आमच्या खासगी जागेत आहेत’, अशी माहिती ही आरोग्यसेवा पुरविणाऱ्या ‘आर. डब्ल्यू.’ कंपनीच्या प्रतिनिधींनी दिली.

ठाणे जिल्ह्यात सेवा सुरू असल्याचा दावा

दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाड भागात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत एक फिरता दवाखाना १५ जानेवारीपासून कार्यान्वित असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी अमोल वाघ यांनी दिली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.