Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुसळधार पावसामुळे पुणे शहर आणि आजूबाजूच्या भागातील शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पिंपरी, चिंचवड, भोर, वेल्हे, मावळ, मुळशी आणि खडकवासला येथील शाळा बंद राहणार आहेत. त्याशिवाय पुण्यातील सर्व पर्यटन स्थळंही बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. खासगी कार्यलयांनाही असे आदेश देण्यात आले आहेत.
एनडीआरएफच्या टीम तैनात
पुण्यात मुसळधार पावसामुळे अग्निशमन दलाचे २०० हून अधिक जवान आणि अधिकारी शहरातील विविध भागात तैनात करण्यात आले आहेत. सखल भागात असलेल्या घरं आणि इमारतींमध्ये अडकलेल्या सुमारे १६० लोकांना अग्निशमन दलाने सुखरुप घराबाहेर काढून सुरक्षितस्थळी हलवलं आहे. एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड परिसरातील एकता नगरमध्ये पाणी साचल्याने अनेक लोक घरात अडकले आहेत, या नागरिकांसाठी एनडीआरएफची दोन पथकं रवाना करण्यात आली आहेत.
प्रशासनाच्या विनंतीवरुन तळेगाव येथील एनडीआरएफच्या पाचव्या बटालियनकडून पथकं पाठवण्यात आली आहेत. पुण्यातील वारजे परिसरात एनडीआरएफची तिसरी टीम तैनात करण्यात आली आहे. पूरग्रस्त भागात अडकलेल्या स्थानिक लोकांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ आणि भारतीय लष्कराचं पथक पुण्यातील एकता नगरमध्ये मदतकार्य सुरू आहे. पुण्यात पावसाने थैमान घातलं असून अनेक भागातील घरांमध्ये पाणी शिरलं आहे. जनजीवन विस्कळित झालं असून अनेक नागरिकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल, पोलीस बचाव कार्य करत असून पावसामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत केली जात आहे.
पवना धरण ५८ टक्के भरलं
पुण्यात पावसाची संततधार सुरू असून अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवडला पाणी पुरवणारा पवना धरण बुधवारी दुपारपर्यंत आपल्या क्षमतेच्या ५८ टक्के भरलं आहे.