Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Mumbai Rains Update: तानसा पाठोपाठ वैतरणा धरण भरले, मुंबईसह ठाण्यातील पाणी कपात मागे; अंबरनाथकरांची पाण्याची चिंता मिटली
वैतरणा ओसंडून वाहू लागले
संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एक असलेला शहापूर तालुक्यातील मोडक-सागर तलाव म्हणेजच वैतरणा धरण गुरुवारी सकाळी १०.४० वाजण्याच्या सुमारास ओसंडून वाहू लागले आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तानसा, विहार आणि तुळशीनंतर या हंगामात ओव्हरफ्लो होणारे हे चौथे तलाव आहे. भातसा, मध्य वैतरणा आणि अप्पर वैतरणा अद्याप भरणे बाकी आहे. मोडक-सागर तलावाची पूर्ण साठवण क्षमता १२,८९२.५ कोटी लिटर (१,२८,९२५ दशलक्ष लिटर) आहे.गेल्या वर्षी ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवर बांधलेला मोडक-सागर २७ जुलै रोजी रात्री १०.५२ वाजता ओव्हरफ्लो झाला होता.
याबाबत बीएमसी एक्स पोस्ट करत सांगितले की, मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. परिणामी पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. सद्यस्थितीत विहार, तुळशी, तानसा, मोडकसागर ही चार जलाशये ओसंडून वाहू लागली आहेत. आज सकाळी ६ वाजेपर्यंत पाणीसाठा ६६.७७ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. या संपूर्ण स्थितीचा आढावा लक्षात घेता, मुंबई महानगराच्या पाणीपुरवठ्यात सध्या लागू असलेली १० टक्के पाणी कपात ही सोमवार दिनांक २९ जुलै २०२४ पासून मागे घेण्यात येत आहे. तसेच, ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभागातील ग्रामपंचायतीना बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यातील १० टक्के कपात देखील सोमवार दिनांक २९ जुलै २०२४ पासून मागे घेण्यात येत आहे.
बारवी धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ
बदलापूर : बारावी धरण क्षेत्रात दमदार पाऊस पडल्याने बारवी धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. २५ जुलै रोजी सकाळी ११.०० वाजता धरणाची पाणी पातळी ६७.७० मी. एवढी आहे. यामुळे बारवी धरणाचे स्वयंचलीत वक्रद्वारे (गेट) येणाऱ्या काही दिवसात उघडण्याची शक्यता आहे. परिणामी बारवी धरणातून बारवी नदीत पाण्याचा विसर्ग सुरु होईल, असे एमआयडीसीकडून सांगण्यात आले आहे. तसेच एमआयडीसीने कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाड तहसीलदार यांना बारवी धरणातून बारवी नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबाबतचे पत्र सुद्धा दिले आहे.
बारवी नदीकाठच्या विशेषतः आस्नोली, चांदप, चांदपपाडा, पिंपळोली, सागांव, पाटीलपाडा, पादीरपाडा, कारंद, मोऱ्याचापाडा, चोण, रहाटोली, नदी काठावरील इतर शहरे व शहरातील सरकारी यंत्रणा तसेच गावांतील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांनी गांवातील नागरिकांना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याची सूचना देण्याची विनंती केली आहे.तसेच या काळात कोणत्याही प्रकारे वाहत्या पाण्यात नागरिकांना आणि पर्यटकांना प्रवेश न देणेबाबत तसेच नदीच्या पात्रात पोहण्यास मज्जाव करणेबाबत सूचना देण्यात यावी, असेही एमआयडीसीने तहसीलदार यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.
चिखलोली धरण जुलै महिन्यातच ओव्हरफ्लो; अंबरनाथकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली!
अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणारे चिखलोली धरण जुलै महिन्यातच ओवरफ्लो झाले असून त्यामुळे अंबरनाथकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. चिखलोली धरणातून अंबरनाथ शहराच्या पूर्व भागाला दररोज ६ ते ७ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. या धरणाची क्षमता २.२६ घनमीटर इतकी असून जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे हे धरण लवकर भरले आहे.