शहर वेडेवाकडे वाढले असून, योग्य नगर नियोजन नसल्याने पूरपरिस्थिती ओढवते आहे. हा संपूर्णपणे संबंधित सरकारी खात्यांचा निष्काळजीपणा असून, नागरिकांचे झालेले नुकसान सरकारने भरून दिले पाहिजे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरे यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना शासन प्रशासनावर त्यांनी कठोर शब्दांत टीका केली.
मुंबई बकाल व्हायला वेळ लागला, पुणे बकाल व्हायला वेळ लागणार नाही
‘राज्य सरकार, प्रशासन व पुणे महापालिकेच्या चुकांमुळे पूर आला असून शहराचा विकास आराखडा तयार होतो परंतु नगर नियोजन (टाउन प्लॅनिंग) केले जात नाही. जमीन दिसली की विकण्याचा प्रकार सध्या जिकडे तिकडे सुरू आहे. मुंबईत ज्यावेळी लोखंडवाला कॉम्पेक्स झाले त्यावेळी आम्हाला वाटलं वेगळी मुंबई झाली पण पुणे कुठपर्यंत पसरतंय, याचा अंदाज लागत नाहीये. नगरपालिकेमधले अधिकारी आणि राज्य सरकारमधील नेते यांचे नेक्सस आहे. मुंबई बकाल व्हायला वेळ लागला, पुणे बकाल व्हायला वेळ लागणार नाही’ असे राज ठाकरे म्हणाले.
याला काय सरकार चालविणे म्हणतात काय…?
गेली दोन तीन वर्ष केंद्र सरकार महानगरपालिकेच्या निवडणुका घेत नाहीये. इथे नगरसेवक नाही. नगरसेवक नसल्याने जबाबदारी घेणार कोण, प्रशासनाशी बोलयचे कुणी? हा प्रश्न आहे. महानगर पालिकांत प्रशासकीय कारभार चालू असताना, ही सगळी जबाबदारी त्यांनीत घेतली पाहिजे, असे सांगतानाच पुण्यात पूर आलेल्या काही ठिकाणी पुनर्विकासाचा प्रश्न आहे, असे सांगितले जात आहे. त्या लोकांशी शासनाने बोलायला हवे. बाहेरच्या राज्यातील लोक येऊन घरे मिळवतात, पण इथल्या लोकांचा घरांसाठीचा संघर्ष सुरू आहे. याला काय सरकार चालविणे म्हणतात का? असा संताप व्यक्त करत राज्य शासनाच्या कामावर राज यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.
जे राज्याचे मालक त्यांचा घरांसाठी संघर्ष
बाहेरच्या राज्यातील लोक येऊन घरे मिळवतात, पण इथल्या लोकांचा घरांसाठीचा संघर्ष सुरू आहे. मुंबईमध्ये झोपडपट्टी पुर्नविकास योजनेअंतर्गत बाहेरच्या राज्यातील लोक फुकट घरे घेऊन जातायेत आणि जे लोक या राज्याचे मालक आहे, त्यांना घरी मिळत नाहीत. हे चित्र बदलले पाहिजे, अशी अपेक्षाही राज यांनी व्यक्त केली.